"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:59 IST2025-09-29T15:49:16+5:302025-09-29T15:59:31+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींना शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
Kamaltai Gawai: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण रामकृष्ण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले आहे. अमरावती येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी भारताच्या विद्यमान सरन्यायाधीशांच्या मातोश्रींना आमंत्रित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र आता गवई कुटुंबामध्येच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरुन स्पष्टता नसल्याचे समोर आले आहे. कमतलाई गवई यांनी पत्र लिहून आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे म्हटलं. दुसरीकडे कमलताई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी मात्र त्यांच्या मातोश्रींनी निमंत्रण स्विकारल्याचे म्हटले आहे.
आरएसएसच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रसाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रणामुळे नवा वाद पेटला आहे. डॉ. कमलताई गवई यांच्या नावाने सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे. कमलताई गवई यांनी पत्र लिहित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. मात्र राजेंद्र गवई यांनी कमलताई यांनी निमंत्रण स्विकारले असून कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलणार नाही असे म्हटले. त्यामुळे आता ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला कमलताई गवई उपस्थित राहणार की त्यांचा निर्णय बदलणार याचीच चर्चा सुरु झाली आहे.
कमलताईंनी पत्रात काय म्हटलं?
"अमरावती महाराष्ट्र राज्यातून प्रकाशित झालेल्या आर.एस. एस विजयादशमी कार्यक्रम दि. ०५ ऑक्टोबर सायं. ६:३० वाजता आयोजीत श्रीमती नरसम्मा महाविद्यालय मैदान होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी धादांत खोटी आहे. श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत व देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर एस एसच्या अमरावती येथील आगामी होवू घातलेल्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही. सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेनी याची नोंद घ्यावी. विजयादशही ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हांकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादयामी महत्त्वपूर्ण आहे. अपप्रचार किंवा बातमीला सामाजिक दृष्ट्या बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते. तमाम माझ्या आंबेडकरी जनतेनी याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा. मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आरएसएसचे षडयंत्र आहे. सदरहू निमंत्रण मी स्विकृत करत नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक गवई परिवारातर्फे शुभेच्छा," असं कमलताई गवई यांच्या पत्रात म्हटलं आहे.
मुलगा म्हणून आईच्या पाठीशी खंबीरपणे उभा - राजेंद्र गवई
"५ तारखेला आरएसएसचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे. त्याचं निमंत्रण कमलताई गवई यांनी स्विकारले आहे. मी आई कमलाताई सोबत आहे. आईने जो निर्णय घेतला आहे त्यात मी त्यांना एक सांगेल की मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते. विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे संबंध होते. संबंध भावा भावांचे होती पण त्यांची विचारधारा ही वेगवेगळी होती. त्यामुळे कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही. त्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे. आमच्यात मैत्री राहिल परंतु आमची विचारधारा ही पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलट्या सुलट्या टीका केल्या जातात. भूषण गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामहून विरोधक टीका टिप्पणी करत आहेत. काही सकारात्मक देखील टिप्पणी होत आहे. पण मी त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. आम्ही सर्वधर्मसमभावाला मानणारे आहोत. सर्वधर्मसमभावाच्या पक्ष सोबत काल होतो आजही आणि आणि उद्याही राहणार आहोत," अशी प्रतिक्रिया राजेंद्र गवई यानी दिली.