नागपुरात बिल्डर्सविरोधात ग्राहकराजाची सर्वाधिक नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:41 IST2018-06-13T22:40:33+5:302018-06-13T22:41:48+5:30
बाजारात विविध माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मात्र फारच कमी लोक पुढाकार घेतात. नागपुरातील जिल्हा ग्राहक मंचाकडे २०१६ सालापासून सुमारे १६०० तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सच्या विरोधात होत्या, हे विशेष. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता, त्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

नागपुरात बिल्डर्सविरोधात ग्राहकराजाची सर्वाधिक नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाजारात विविध माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मात्र फारच कमी लोक पुढाकार घेतात. नागपुरातील जिल्हा ग्राहक मंचाकडे २०१६ सालापासून सुमारे १६०० तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सच्या विरोधात होत्या, हे विशेष. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता, त्या मानाने हा आकडा फारच कमी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे आलेल्या तक्रारींबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मंचाकडे किती तक्रारी आल्या, किती तक्रारी सोडविण्यात आल्या, ग्राहकांच्या बाजूने किती निकाल लागले, सर्वात जास्त तक्रारी कुणाविरोधात होत्या, इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त माहितीनुसार, या २६ महिन्यांच्या कालावधीत मंचात १६०४ तक्रारी दाखल करण्यात आल्या. यातील सर्वच तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सर्वात जास्त तक्रारी बिल्डर्सविरोधात आल्या. १० ते २० लाखापर्यंत रकमेच्या
फसवणुकीबाबत बिल्डर्सविरोधात ३०३ तक्रारी आल्या.
दरम्यान, ग्राहक मंचने विविध अशा २७ प्रकरणांमध्ये २ लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर या कालावधीत मंचकडे ४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा महसूल जमा झाला.
६६ टक्के तक्रारींचा निकाल ग्राहकांच्या बाजूने
या कालावधीत निपटारा झालेल्या तक्रारींमध्ये ग्राहकांच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रमाण अधिक आहे. ७६९ प्रकरणांत ग्राहकांच्या बाजूने निकाल लागला तर २९७ प्रकरणांत ग्राहकांच्या विरोधात निकाल गेला.
वर्षनिहाय तक्रारी
वर्ष तक्रारी
२०१६ ७९९
२०१७ ६१७
२०१८ (फेब्रुवारीपर्यंत) १८८