विधानसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 21:00 IST2024-08-09T21:00:17+5:302024-08-09T21:00:34+5:30
प्रत्येक जिल्ह्यात जाणार : इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार

विधानसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर
कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे हे २० ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. ते विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेणार असून इच्छुक उमेदवारांशी चर्चाही करणार आहेत.
वर्षभरापूर्वी राज ठाकरे यांनी नागपूर दौरा करीत विदर्भातील बहुतांश पदाधिकाऱ्यांकडील जबाबदाऱ्या बदलल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी आपण विदर्भावर लक्ष देऊ असे संकेत दिले होते. आता स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेच्या टीम प्रत्येक जिल्ह्यात येऊन गेल्या. नागपूरसाठी मनसेचे नेते बापु धोत्रे व वैभव वालवालकर हे दोनदा येऊन गेले. प्रत्येक जिल्ह्यातील टीमने स्थानिक पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांची भेट घेतली व आपला अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात या सर्व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहेत.
मनसेचे नागपूर शहर अध्यक्ष चंदू लाडे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचा दौरा नागपूरपासून सुरू होईल. येथे १२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वणी, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा असा दौरा ते करतील. राज ठाकरे हे स्वत: लक्ष देऊन सक्षम उमेदवार निवडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.