नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस
By Admin | Updated: August 10, 2015 02:40 IST2015-08-10T02:40:38+5:302015-08-10T02:40:38+5:30
प्रशासनाला घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकारने, दक्षिण नागपुरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समाधान शिबिर घेतले.

नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस
समाधान शिबिर : २३ शासकीय विभागांचा सहभाग
नागपूर : प्रशासनाला घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकारने, दक्षिण नागपुरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समाधान शिबिर घेतले. शिबिरात मोठ्या अपेक्षेने नागरिकांनी तक्रारींचा पाऊसच पाडला. वैयक्तिक अणि सार्वजनिक हिताच्या जवळपास दोन हजारावर तक्रारी विविध विभागांकडे आल्या. या तक्रारींच्या समाधानाचा आढावा घेतल्यावर काहीच समस्यांना आॅन दी स्पॉट न्याय मिळाला. बहुतांश समस्या पुढे वर्ग करण्यात आल्या.
या शिबिरात शासनाच्या जवळपास २३ विभागाने आपले स्टॉल लावले होते. भूमी अभिलेख, नागपूर महापालिका, नागपुर सुधार प्रन्यास, अदिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा सेतू विभाग, संजय गांधी निराधार योजना या विभागांच्या कार्यालयापुढे तक्रारकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. जमिनीच्या नामांतरणाच्या, फेरफार, मोजणीच्या सर्वाधिक तक्रारी नागरिकांनी केल्या. झोपडपट्टीचे पट्टे वाटप, म्युटेशन, जन्ममृत्यूच्या नोंदी, रस्त्यांची दुरुस्ती आदी समस्या मनपाकडे आल्या. अविकसित लेआऊटमधील मूलभूत समस्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नागपूर सुधार प्रन्यासने स्वीकारल्या. गटारीची समस्या, पाण्याचा प्रश्न, रहिवासी जमिनीवरील आरक्षण काढणे, संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय प्रत्येक मतदार संघानिहाय सुरू करणे, तलावाचे सौंदर्यीकरण, क्रीडा संकुलाची निर्मिती या सार्वजनिक मागणीसाठी काही राजकीय पक्षांनीही निवेदने दिली.
यासर्व स्टॉलमध्ये सर्वाधिक यशस्वी स्टॉल जिल्हाधिकारी कार्यालयाचा ठरला. ५० च्या जवळपास लोकांच्या समस्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्राने सोडविल्या. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल आदी दाखले विद्यार्थ्यांना ताबडतोब मिळाले.
महावितरणच्या स्टॉलवर आलेल्या ३४ तक्रारीपैकी वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे त्यांनी ताबडतोब समाधान केले. काही तक्रारी सोडविण्याला नियमानुसार वेळ लागत असल्याने, त्या तक्रारी पुढे वर्ग करण्यात आल्या. महापालिकेने तर नागरिकांच्या समाधानासाठी कर्मचाऱ्यांची फौजच लावली होती. नागरिकांचे अर्ज स्वीकारून, पुढे वर्ग करण्याउपरांत आॅन दी स्पॉट समाधानाचे कार्य बोटावर मोजण्याइतपतच झाले. शिबिरात बहुतांश विभागाने नागरिकांचे अर्ज स्वीकारून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देऊन, त्यांचे समाधान केले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय लोकदलतर्फे नासुप्रचा निषेध
नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यामुळे मूळ भूमिधारक आपल्या अधिकारापासून वंचित होत आहे. संतोषीनगर येथील लेआऊट महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ शासकीय अधिसूचनेनुसार नासुप्रच्या १९०० लेआऊट मध्ये मंजूर केलेले आहे. आता हेच भूखंड नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी बफर झोनमध्ये आरक्षित करून तेथील भूखंडधारकांना मालमत्ता हक्कापासून वंचित करीत आहे. तर बिल्डर्सला बांधकाम करण्यास मंजुरी देत आहे. नासुप्रच्या या हुकुमशाही धोरणाचा राष्ट्रीय लोक दलतर्फे निषेध करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव खंडाळे यांनी या निषेधाची पत्रके शिबिरात वाटली.
मुंबईच्या धर्तीवर गिरणी कामगारांना
सदनिका बांधून द्या
मुंबईमधील गिरणी कामगारांना म्हाडातर्फे देण्यात आलेल्या सदनिकांप्रमाणे नागपूर येथील एम्प्रेस मिल्स गिरणी कामगारांना सदनिका बांधून द्याव्यात, अशी मागणी एम्प्रेस मिल कामगार, कर्मचारी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. या मागणीसाठी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी एम्प्रेस मिल कामगारांची मागणी उचलून धरली होती. आता त्यांचेच सरकार असल्याने, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीवजा विनंती सोमेश्वर राऊत, दिगांबर मोहिते, जी.एम. उमरेडकर, रामचंद्र कडवेकर यांनी शिबिरात केली.
प्रन्यासमुळे त्रस्त भूखंडधारकांची तक्रार
नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांमुळे त्रस्त असलेल्या नरेश इटनकर व दीपक वैद्य यांनी समाधान शिबिरात प्रन्यासचे कार्यकारी अधिकारी अरविंद देशभ्रतार यांच्याविरुद्ध तक्रार केली. ६.७६ लाख रुपये भरल्यानंतरही ६२ महिन्यांपासून आम्ही वाटपपत्राच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप करीत, प्रन्यासने आमच्याशी विश्वासघात केला आहे. आम्हाला न्याय द्यावा, अशा मागणीचे पत्र त्यांनी शिबिरात वाटले.
खिसेकापू, मोबाईल चोरांचा धुडगूस
शिबिरातील गर्दीचा फायदा घेत या चोरट्यांनी काही लोकांची पर्स चोरली तर काहींचे मोबाईल उडविले. हे चोरटे हातसाफ करून पळत असताना, नागरिकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे येथे पोहचले. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येथे असल्याने पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. तरीही गर्दीचा आड घेत, चोरट्यांनी शिबिरात प्रवेश घेतला. या चोरट्यांनी ओसीडब्ल्यूचे प्रकाश निंबाळकर यांच्यासह अनेकांना शिकार बनविले. निंबाळकर यांचा मोबाईल चोरला. या चोरट्यांच्या उपद्रवामुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कारवाई क रण्यास सांगितले. त्यामुळे पोलीसही चोरट्यांच्या शोधात लागले. यादरम्यान शिबिरातील नागरिकांना दोघे जण संशयास्पद स्थितीत आढळून आले. लोकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. त्यांना पोलिसांच्या हवाली केले. यापूर्वी धंतोली येथील मुंडले सभागृहात आयोजित समाधान शिबिरातही अशी घटना घडली होती. पोलिसांनी दोघांचीही चौकशी करून, त्यांना अटक केली. सक्करदरा पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.