लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका बुधवारी एसटी महामंडळाला बसला. पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला आपल्या २२ मार्गावर धावणाऱ्या ४१६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे विभागाला ७ लाख २६ हजार ५०९ रुपयांचा फटका बसला.
एसटी महामंडळाच्या घाट रोड आगारातून नागपूर-कुही, शिवा-अडेगाव-गौराळा सीताखोरी, कळमेश्वर-मोहपा, कळमेश्वर-लोणारा, कळमेश्वर-लाडईच्या १२१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. गणेशपेठ आगारातून आरमोरी-गडचिरोली, उमरेड आगारातून उमरेड-कुही, कुही-वडोदा, उमरेड-हिंगणघाट, गोंडबोरी-भिसी, उमरेड-भिवापूर पचखेडी, उमरेड-तारणा- मांढळ-पाचखेडी, उमरेड-मेंढा, उमरेड-धानलाच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. काटोल आगारातून काटोल-पाणढाकणी, भोरगढ, रामटेक आगारातून रामटेक-निमखेडा, रामटेक-मौदा, सावनेर आगारातून मोहपा, लोणारा, इमामवाडा आगारातून हिंगणा-कान्होलीबारा, मलाजखंड-बपेरा तसेच वर्धमाननगर आगारातून नागपूर-पिपरा, नागपूर-कान्होलीबारासाठी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली. विभागात पावसामुळे एसटीच्या बसेस २१ हजार २८० किलोमीटर धाऊ शकल्या नाहीत. तर अनेक प्रवाशांनी पावसामुळे आपला प्रवासाचा बेतच रद्द केला. दरम्यान, एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोद चवरे यांच्याशी पावसाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने काय नियोजन केले, याची माहिती जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.