नागपुरात नववर्ष स्वागताच्या आनंदावर पावसाचे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:51 IST2019-12-31T23:50:32+5:302019-12-31T23:51:43+5:30
नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली.

नागपुरात नववर्ष स्वागताच्या आनंदावर पावसाचे विरजण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. यामुळे पारा चांगलाच खालावला होता.
सकाळी शहरातील वातावरण ढगाळी होते. काही काळ उनही पडले, मात्र दुपारनंतर अचानकपणे पाऊस आला. त्यानंतर सर्वत्र शीतलहर सुरू झाली. रात्रीपर्यंत हे वातावरण कायम होते. दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा ५ अंश सेल्सिअसने घटून २३.१ वर पोहचले. या हवामानामुळे दिवसाचे तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. मागील २४ तासात यात बरीच घट झाली.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात अचानकपणे हा बदल जाणवला. हवामान खात्याने यापूर्वीच संभाव्य वातावरणाची सूचना दिली होती. जिल्हा प्रशासनानेही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी गारांचा पाऊस होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
अचानक बदललेल्या या वातावरणामुळे नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी केलेली अनेकांची तयारी वाया गेली. मोकळ्या मैदानात अथवा घरांच्या गच्चीवर गार वाऱ्याचा सामना न करता आल्यामुळे अनेकांना घरातच नव वर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करावा लागला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात एक मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर अकोल्यात २.१, अमरावतीमध्ये एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात चंद्रपुरातील वातावरणाचा पारा ५.७ अंशावर सर्वात खाली होता. गडचिरोलीत ८ अंशावर किमान तापमान नोंदविण्यात आले. या शिवाय अन्य जिल्ह्यातही पारा खाली उतरलेला होता. यवतमाळमध्ये किमान तापमान विदर्भातून सर्वात अधिक म्हणजे १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
३ जानेवारीपर्यंत पावसाचे वातावरण
हवामान खात्याच्या माहितीनुसार, ३ जानेवारीपर्यंत वातावरण पावसाळी राहण्याची शक्यता आहे. आकाशात ढग राहतील. थांबून थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळी वातावरण दूर होताच पुन्हा जोराची थंडी पडू शकते, असा अंदाज आहे. पावसाच्या वातावरणामुळे दिवसाचे तापमानही खालावलेलेच राहील, असे सांगितले जात आहे.