रेल्वेकडून आता तिकीट तपासणीसांची होणार बायोमेट्रिक हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:47 IST2025-09-03T14:45:03+5:302025-09-03T14:47:57+5:30
Nagpur : नागपूर आणि बल्लारशाह डेपोतून सुरुवात; ड्यूटी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करणे आणि तिकीट तपासणी कार्याची जबाबदारी सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे.

Railways will now introduce biometric attendance for ticket checking
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आधुनिकीकरण आणि पारदर्शकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तिकीट तपासणी करणाऱ्यांसाठी (टीटीई) बायोमेट्रिक साइन ऑन/ऑफ प्रणाली लागू केली आहे. ही योजना रेल्वे बोर्डाच्या नव्या धोरणांतर्गत सुरू करण्यात आली असून, ड्यूटी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करणे आणि तिकीट तपासणी कार्याची जबाबदारी सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या व्यवस्थेत आता टीटीईची ड्यूटी सुरू करणे आणि ती पूर्ण करणे या दोन्ही प्रक्रिया बायोमेट्रिक पडताळणीद्वारेच प्रमाणित केल्या जाईल. यामुळे कर्मचारी आपल्या मूळस्थान व गंतव्य स्थानकांवर प्रत्यक्ष उपस्थित असल्याची खात्री होईल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. ही सुविधा नागपूर विभागातील नागपूर तसेच बल्लारशाह या दोन प्रमुख डेपोमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नागपुरात ६ बायोमेट्रिक यंत्रणा तर बल्लारशाह डेपोमध्ये ४ यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. या डेपोमधील सर्व तिकीट तपासणी कर्मचारी आता ड्यूटी साइन ऑन /ऑफसाठी केवळ बायोमेट्रिक प्रणालीचाच वापर करत आहेत.
नागपूर विभागातील इतर सर्व डेपोमध्ये लवकरच ही प्रणाली विस्तारित करण्याची योजना आहे. ते झाल्यानंतर विभागातील प्रत्येक टीटीईला फक्त बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ड्यूटी साइन ऑन / ऑफ करणे बंधनकारक राहणार. ही योजना पारदर्शकतेस बळकटी देणार असून, तिकीट तपासणी सेवेत जबाबदारी तसेच कार्यक्षमताही वाढवण्यास कारणीभूत ठरणार असल्याचा विश्वास या संबंधाने रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
डिजिटल सोयी-सुविधांवर भर
देशभरात प्रचंड मोठे नेटवर्क असलेल्या रेल्वेत प्रवाशांसाठीच्या अनेक सोयी-सुविधा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. आधुनिकीकरणाची कास धरतानाच रेल्वे प्रशासनाने अलीकडे पारदर्शितेवरही भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अशा प्रकारे आपल्या कर्म-चाऱ्यांच्या सेवा संबंधानेही डिजिटल उपाययोजना राब-विण्याला सुरुवात केल्याने रेल्वे संचालनावरील विश्वास आणखी दृढ होईल, असे मत स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.