रेल्वेने २१६ दिवसांत १५० दशलक्ष टन मालाची वाहतूक ! चार वर्षांच्या तुलनेत मोठा विक्रम
By नरेश डोंगरे | Updated: November 3, 2025 20:29 IST2025-11-03T20:27:52+5:302025-11-03T20:29:04+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा विक्रम : कोट्यवधींची कमाई

Railways transport 150 million tonnes of goods in 216 days! A record high compared to four years
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ २१६ दिवसांत १५० दशलक्ष टन माल लोडिंग पूर्ण करून दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेने माल वाहुतकीत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. दपूम रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत हा मोठा विक्रम आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, देशातील विविध तापघरे, पोलाद संयंत्रे आणि कारखान्यांना कोळसा व खनिजांचे अखंड वितरण करून देशाच्या औद्योगिक वाढीस दपूम रेल्वेकडून गती दिली जात आहे.
सन २०२२-२३ मध्ये १५० दशलक्ष टन मालाच्या वाहतुकीचा टप्पा २६५ दिवसांत, २०२३-२४ मध्ये २४४ दिवसांत, २०२४-२५ मध्ये २२६ दिवसांत गाठला होता. तर यावर्षी केवळ २१६ दिवसांत ही कामगिरी साध्य करून कोट्यवधींचे उत्पन्न मिळवण्यात दपूम रेल्वेला यश आले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची माल वाहतुकीत बजावण्यात आलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अन्न धान्य, खनिज पदार्थ, कोळसा, पोलाद, सिमेंट आणि या सारख्याच महत्त्वाच्या औद्योगिक आणि ऊर्जा संसाधनांची नियमित आणि वेळेवर पुरवठा केली जात असल्याने ही कामगिरी साध्य झाल्याचे दपूम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
याउल्लेखनीय कामगिरीत नागपूर, बिलासपूर आणि रायपूर या तिन्ही रेल्वे विभागांचा (झोनचा) मोलाचा वाटा आहे. माल वाहतुकीतील सतत वाढणारी कार्यक्षमता रेल्वेच्या संरचनात्मक आणि परिचालन क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे स्पष्ट करते. रेल्वेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चाैथ्या लाईनचे काम, यार्ड आधुनिकीकरण आणि विद्युतीकरण यांसारख्या उपक्रमांमुळे रेल्वेची वेग आणि वहनक्षमता दोन्ही वाढल्याचेही या संबंधाने अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सणोत्सवात विशेष सेवा
मालवाहतुकीसोबतच प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रातही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने उल्लेखनीय कामगिरी केल्याचा दावा केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सण-उत्सवांच्या काळात विशेष रेल्वेगाड्यांचे संचालन करण्यात आले. श्रावण मासात श्रावणी स्पेशल गाड्या, तर दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि छठपुजेच्या काळात विशेष पूजा गाड्या (फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन) चालवून प्रवाशांना दिलासादायक अनुभव दिल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.