ट्रॅकवरील अतिक्रमणाचे धोके सांगण्यासाठी रेल्वेने घेतला 'नुक्कड'चा आधार
By नरेश डोंगरे | Updated: May 21, 2024 21:27 IST2024-05-21T21:27:13+5:302024-05-21T21:27:27+5:30
जागोजागी 'नुक्कड' (पथनाट्या) घेऊन रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे.

ट्रॅकवरील अतिक्रमणाचे धोके सांगण्यासाठी रेल्वेने घेतला 'नुक्कड'चा आधार
नागपूर : रेल्वे स्थानक परिसर आणि ट्रॅकवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणारे धोके तसेच घाईगडबडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनोखी पद्धत अवलंबिली आहे. त्यासाठी जागोजागी 'नुक्कड' (पथनाट्या) घेऊन रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे.
रेल्वे लाईनच्या बाजुच्या जागेवर काही जण अतिक्रमण करतात. काही जण बगिच्यासारखे रेल्वे ट्रॅकवर, आजुबाजुला फिरतात. त्यामुळे अपघाताचा धोका तीव्र होतो. काही जण रेल्वे स्थानकावर गाडी सुटेपर्यंत घुटमळतात. हातात खाद्यपदार्थ किंवा पाण्याची बाटली घेऊन ओल्या हाताने धावत्या रेल्वेगाडीचा दंडा पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. या संबंधाने वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगूनही नागरिक त्याकडे लक्ष द्यायला तयार नसतात. ते ध्यानात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने आता पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर 'दुर्घटना से देर भली' चे प्रयोग करून प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आमला स्थानकावर प्रयोग
अशाच प्रकारे १५ कलावंतांच्या पथकाने आमला स्थानकावर जनजागरणाचा प्रयोग सादर केला. हे करतानाच रेल्वेचे अपघात टाळा, आत्महत्येचा विचार करू नका, जीवन अमुल्य आहे, असाही संदेश प्रवाशांना दिला.
संशयितांची तात्काळ माहिती द्या
रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्थानकाच्या आजुबाजुला कुणी संशयास्पद व्यक्ती अथवा काही वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे प्रशासन किंवा जवळ दिसणाऱ्या पोलिसांना त्याची माहिती द्या, असे आवाहनही या पथनाट्यातून केले जात आहे.