लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांना दोन प्रसिद्ध ज्योतीर्लिंगांच्या दर्शनासह दक्षिण भारताची यात्रा घडवून आणण्याची योजना भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिजम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी)ने जाहिर केली आहे. आयआरसीटीचे कार्यकारी अधिकारी राहूल होळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
१० दिवस आणि ११ रात्री, अशी ही यात्रा राहणार असून २१ ऑगस्ट २०२५ ला ती भारत गाैरव ट्रेनने मध्य प्रदेशातील रिवा सतना येथून सुरू होणार आहे. स्लिपर कोच, थर्ड एसी आणि सेकंड एसी अशा वेगवेगळ्या कोचमधून प्रवासी त्यांच्या सोयीनुसार तिकिट काढू शकतात. त्यासाठी क्रमश: २०,८०० रुपये, ३५,००० रुपये आणि ४६,५०० रुपये प्रति व्यक्ती असा या यात्रेचा खर्च राहणार आहे. प्रवाशांना सकाळच्या चहा नाश्त्यापासून तो दुपार आणि रात्रीच्या शुद्ध शाकाहारी जेवणापर्यंतची सुविधा, श्रेणीनुसार हॉटेलमधील मुक्काम, दर्शनीय स्थळांवर जाण्यासाठी टूरिस्ट बसेसची सुविधा हे सर्व याच खर्चात समाविष्ट असून या सर्व व्यवस्थेची जबाबदारी आयआरसीटीसीकडे राहणार आहे. यात्रेत सहभागी प्रवाशांना विम्याचे कवच रेल्वेकडून दिले जाणार आहे. भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून ठिकठिकाणी टूर एस्कॉर्टस्, टूर मॅनेजर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही रेल्वेकडून केली जाणार आहे, असे होळकर यांनी पत्रकारांना सांगितले. चुकून यात्रेची तारिख अथवा कोणत्याही नियोजित कार्यक्रमात बदल झाला तर रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
विविध प्रेक्षणिय स्थळे२१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट याकालावधीत ही यात्रा घडवून आणली जाणार असून, ती रिवा, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, ईटारसी, बैतूल, नागपूर आणि सेवाग्राम आदी रेल्वे स्थानकावरून या यात्रेत सहभागी प्रवाशांना घेतले जाणार आहे. त्यांना अन्य ठिकाणांची सफर घडविण्यासोबतच तिरूपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी तसेच मल्लिकार्जून आदी दर्शनीय स्थळांवरही भाविकांना नेले जाणार आहे.