धुक्यात हरविले रेल्वेचे ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’, रेल्वेचे वेळापत्रक अस्तव्यस्त
By नरेश डोंगरे | Updated: January 12, 2025 20:04 IST2025-01-12T20:03:59+5:302025-01-12T20:04:06+5:30
अनेक गाड्यांना उशिर, डिव्हाईसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

धुक्यात हरविले रेल्वेचे ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’, रेल्वेचे वेळापत्रक अस्तव्यस्त
नरेश डोंगरे, नागपूर : उत्तर भारतातील शितलहरींनी रेल्वेच्या वेळापत्रकाला पुरते अस्तव्यस्त केले आहे. अनेक गाड्यांची गती रोखतानाच कोट्यवधी रुपये खर्चून घेतलेले 'फॉग सेफ्टी डिव्हाइस'ही धुक्यात हरवल्यासारखे झाले आहे.
थंडीच्या हंगामात दाट धुके पसरत असल्याने रेल्वे गाड्यांच्या गतीवर विपरीत परिणाम होतो. लोको पायलटला धुक्यामुळे ट्रॅक, सिग्नल्स स्पष्ट दिसत नसल्याने जलद अतिजलद गाड्यांची गती प्रतितास ३० ते ६० किलोमिटर मंदावते. एका गाडीची गती मंदावली की तिच्या मागच्या सर्वच गाड्यांची गती कमी होते. परिणामी रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक कोलमडते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी देशभरातील रेल्वेच्या विविध विभागाला 'फॉग सेफ्टी डिव्हाइस' उपलब्ध करून देण्यात आले होते.
जीपीएस तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या डिव्हाईसमुळे रेल्वेच्या लोकोपायलटला दाट धुक्यातही स्पष्ट दिसेल, असा दावा करण्यात आला होता. या डिव्हाईसमुळे रेल्वे ट्रॅक, सिस्टम स्पष्ट दिसत असल्याने रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून उत्तर भारतात शितलहर आल्याने वेगवेगळ्या प्रांतात धुक्याने चादर पसरली आहे. परिणामी दाट धुक्यामुळे दिल्ली, नागपूरसह विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रेंगाळल्या आहेत. त्यामुळे हे डिव्हाईस कुचकामी आहे की रेल्वे प्रशासनाचा दावा खोटा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डिव्हाईस काय कामाचे ?
मध्य रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागाला गेल्या वर्षी '५०० फॉग सेफ्टी डिव्हाईस' दिले होते. त्यात मुंबई विभागाला १२० फॉग सेफ्टी डिव्हाईस, नागपूर विभाग १२०, पुणे विभाग ८०, भुसावळ १०० आणि सोलापूरला ८० डिव्हाईसचा समावेश होता. अर्थात हे सर्व कार्यान्वित असताना गाड्या उशिरा धावण्याने कोट्यवधी खर्चून घेण्यात आलेले हे डिव्हाईस काय कामाचे, असा प्रवाशांचा प्रश्न आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे या संबंधाने विचारणा केली असता एका अधिकाऱ्याने यावर बोलण्याचे टाळले तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने दाट धुक्यासोबतच विकास कामामुळे गाड्या उशिरा धावत असल्याचे म्हटले.