नागपुरात रेल्वे कर्मचा-याला पिस्तुलसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:54 IST2018-08-23T22:53:43+5:302018-08-23T22:54:40+5:30
सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असलेल्या एका तरुणाला पाचपावली पोलिसांनी पिस्तुलासह पकडले.

नागपुरात रेल्वे कर्मचा-याला पिस्तुलसह अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असलेल्या एका तरुणाला पाचपावली पोलिसांनी पिस्तुलासह पकडले.
असलम खान हबीब खान (वय २७, रा. वैशालीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याचा एक साथीदार कमाल चौकातील ताज पान मंदीर समोर बुधवारी रात्री ७.३० वाजता उभे होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे असलमची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले. पिस्तुलात असलेले मॅगझिन रिकामे होते. त्यात एकही काडतूस (गोळी) पोलिसांना आढळली नाही. अधिक चौकशीत त्याच्या सोबतचा साथीदाराचा असलमकडे असलेल्या पिस्तुलासोबत कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. दरम्यानच्या चौकशीत असलमविरुद्ध यापूर्वी एक ३२४ चा गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. तो सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटीत वरिष्ठ लिपिक असल्याचेही तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला भारतीय शस्त्र कायद्याचे कलम ३/ २५ अन्वये अटक केली. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि आर. एल. दुबे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हवलदार रामेश्वर कोहळे, नायक राज चौधरी, अभय साखरे, विजय लांडे, विनोद गायकवाड यांनी ही कामगिरी बजावली.