मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:30 IST2025-10-26T22:28:16+5:302025-10-26T22:30:09+5:30
Railway Accident Control Updates: रेल्वेचे वाढते अपघात लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर, मुंबई, भुसावळ, पुणे आणि सोलापूर अशा पाचही विभागात मार्च २०२५ मध्ये कवचसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
-नरेश डोंगरे, नागपूर
Indian Railway News: भारतीय रेल्वेसाठी अविष्कार ठरलेली 'कवच' प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्राथमिक टप्प्याचे काम मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पुर्ण झाले आहे. आमला - परासिया रेल्वे मार्गावर या प्रणालीच्या फेज-१ची ट्रायलसुद्धा पार पडली आहे.
पुर्णत: भारतीय बनावटीची कवच प्रणाली रेल्वे गाड्यांचा अपघात रोखण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. रेल्वेचे वाढते अपघात लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर, मुंबई, भुसावळ, पुणे आणि सोलापूर अशा पाचही विभागात मार्च २०२५ मध्ये कवचसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नागपूर विभागासाठी ९९१.४२ किमी क्षेत्रासाठी सुमारे २६० कोटी किंमतीची निविदा जारी करण्यात आली होती.
या अनुषंगाने नागपूर विभागात कवच प्रणाली बसविण्याचे काम सुरू झाले. जेथे काम झाले त्या मार्गावर कवच प्रणालीच्या चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात परासिया आणि पालाचौरी स्थानकांदरम्यान लोकोमोटिव्ह चाचणी पार पडली होती. त्यानंतर शनिवारी २५ ऑक्टोबरला आमला–परासिया रेल्वे मार्गावर कवच प्रणालीच्या फेज-वनची ट्रायल घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी झाली ट्रायल
हेड-ऑन कोलिजन (समोरासमोरची टक्कर) आणि रिअर-एंड कोलिजन (मागून येणाऱ्या गाडीमुळे होणारी टक्कर) या दोन्ही प्रकारच्या परिस्थितींची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. हा ट्रायल ब्लॉक सेक्शन जेएनओ–पीसीएलआय दरम्यान पार पडला. चाचणीसाठी डब्ल्यूएजी-९ प्रकारचे लोकोमोटिव्ह इंजिन (कमाल वेग १०० किमी प्रति तास) क्रमांक ४१५७१ ईटी आणि ४१६३९ ईटी वापरण्यात आले.
असे मिळते ‘कवच’
'कवच' भारतीय रेल्वेने विकसित केलेली स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणाली आहे. ती रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) भारतीय रेल्वे आणि देशातील औद्योगिक क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे.
ही प्रणाली ट्रेन, सिग्नल आणि ट्रॅक या तिन्ही घटकांमध्ये वायरलेस रेडिओ आणि जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे सतत संवाद राखते. चुकून दोन गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर किंवा मागोमाग येत असतील, तर प्रणाली आपोआप ब्रेक लावून अपघात रोखते. चालकाने चुकून लाल सिग्नल ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास, इंजिन स्वतः ब्रेक लावते. अपघाताची स्थिती निर्माण झाल्यास आजुबाजुच्या पाच किलोमिटर परिसरात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांनाही तसे संकेत 'कवच'मुळे मिळते.
मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण
नागपूर विभागात कवच प्रणाली बसविण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. ही प्रणाली ट्रेन आणि ट्रॅक दोन्हीवर बसवली जात आहे. मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण नागपूर विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली जाईल, अशी प्रतिक्रिया या संबंधाने मध्य रेल्वे, नागपूर विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली.