रेल्वेतील मेडल घोटाळा; 'गोल्ड पॉलिश सिल्वर मेडल' बंद ! निवृत्तीच्या उंबरठ्यावरील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना फटका
By नरेश डोंगरे | Updated: January 29, 2026 22:46 IST2026-01-29T22:45:50+5:302026-01-29T22:46:24+5:30
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वेचे्या हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबर धक्का देणाऱ्या या प्रकाराची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

रेल्वेतील मेडल घोटाळा; 'गोल्ड पॉलिश सिल्वर मेडल' बंद ! निवृत्तीच्या उंबरठ्यावरील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना फटका
- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदीर्घ सेवेचा सन्मान म्हणून रेल्वेच्या निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक दिले जाणारे 'गोल्ड पॉलिश सिल्वर मेडल' भेसळयुक्त (बनावट) असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या मेडल घोटाळ्याने रेल्वे प्रशासनाला जबर धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे निवृत्त होणाऱ्या कोणत्याच अधिकारी, कर्मचाऱ्याला हे 'सन्मान मेडल' द्यायचे नाही, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वेचे्या हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबर धक्का देणाऱ्या या प्रकाराची माहिती पुढीलप्रमाणे आहे. रेल्वेत प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून दिलेल्या जाणाऱ्या हक्काच्या लाभांसोबतच एक २० ग्राम वजनाचे चांदीचे मेडल प्रदान केले जाते. चांदीच्या या मेडलला सोन्याचे पॉलिश असते. त्यामुळे हे गोल्ड मेडल असल्याचाही भास होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निवृत्तांना हे गोल्ड प्लेटेड मेडल देण्याची परंपरा साधारणत: २० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. रेल्वेतून दर महिन्याला शेकडो कर्मचारी, अधिकारी निवृत्त होतात.
सेवा, निष्ठा आणि सन्मानाचे प्रतीक समजले जाणारे हे मेडल मिळते, याचा त्यांना आणि कुटुंबियांनाही अभिमान वाटतो. मात्र, गेल्या काही महिन्यात प्रदान करण्यात आलेल्या या गोल्ड प्लेटेड चांदीच्या मेडलमध्ये पुरवठादाराने घोटाळा केल्याचे भोपाळमध्ये उघडकीस आले. तक्रारी झाल्यानंतर चाैकशी झाली. त्यात जे मेडल शुद्ध चांदीपासून तयार करण्याची रक्कम पुरवठादार रेल्वे बोर्डाकडून वसुलतो, त्या मेडलमध्ये केवळ ०.२३ टक्केच चांदी असल्याचे उघड झाले. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. भोपाळ विभागात घोटाळा झाला तर अन्य विभागातही तशीच स्थिती असेल, अशी शंका निर्माण झाल्यामुळे रेल्वे बोर्डाने चांगलाच धसका घेतला. परिणामी रेल्वेने ही 'मेडल परंपराच' खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मिळणारच नाही मेडल !
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपूरसह रेल्वेच्या प्रत्येक विभागात दर महिन्याला ३०० ते ४०० अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतात. आता ३१ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर कोणत्याही विभागातून निवृत्त होणाऱ्या कोणत्याच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे मेडल दिले जाणार नाही. आज सकाळपासून रेल्वे प्रशासनात हे वृत्त चर्चला आल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अनेकांना जबर धक्का बसला आहे.