नागपुरात २४ तासांत तीन कुंटणखान्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 00:00 IST2021-07-30T00:00:10+5:302021-07-30T00:00:39+5:30
Raids on three brothels वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या दोन कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. हे दोन्ही कुंटणखाने महिला चालवित होत्या.

नागपुरात २४ तासांत तीन कुंटणखान्यावर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या दोन कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. हे दोन्ही कुंटणखाने महिला चालवित होत्या.
पहिली कारवाई श्रावणनगर वाठोडा येथे पोलिसांनी केली. शालिनी राजू पटले (वय ४५) ही महिला स्वत:च्या घरातच कुंटणखाना चालवित होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिच्याकडे छापा मारून दोन वारांगनांना रंगेहात पकडले. ही कारवाई सुरू असताना तेथे १७ वर्षीय मुलगी आढळली. तिला पोलिसांनी बाल संरक्षण गृहात सोडले.
दुसरी कारवाई हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. संजूबा शाळेमागे राहणारी विद्या धनराज फुलझेले (वय ४२) ही महिला तिच्या घरी ग्राहकांना बोलवून वेश्या उपलब्ध करून देत होती. फुलझेलेच्या कुंटणखान्यावर एक वारांगना सापडली. दोन्ही प्रकरणात अनुक्रमे वाठोडा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी शालिनी पटले आणि विद्या फुलझेले या दोघींना अटक करण्यात आली.
सीताबर्डी पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत दोघांना पकडले
गेल्या अनेक दिवसांपासून निती गाैरव कॉम्प्लेक्सनजीकच्या एका सदनिकेत सुरू असलेल्या कुंटणखान्याचा गुरुवारी पर्दाफाश झाला. प्रेम शुक्ला नामक आरोपी येथे वारांगना उपलब्ध करून देतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तशी आजूबाजूच्या दुकानदारांचीही तक्रार होती. मात्र, शुक्ला नेहमी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून दुकानदारांना धमकावत होता. आज दुपारी त्याच्या सदनिकेत वारांगना शिरताच एकाने सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तेथे छापा मारला. मात्र, त्याचवेळी वारांगना निघण्याच्या तयारीत दिसली. तिला आणि शुक्लाला पोलीस ठाण्यात आणून कलम ११०, ११७ नुसार पोलिसांनी ‘समज कारवाई’ केली.