बोगस पेपरफुटीचे 'रॅकेट' सक्रिय
By Admin | Updated: May 10, 2014 13:47 IST2014-05-10T01:05:40+5:302014-05-10T13:47:54+5:30
अभ्यास न करता 'शॉर्टकट' पद्धतीने गुण मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना चांगलाच फटका पडत असल्याची बाब समोर आली आहे.

बोगस पेपरफुटीचे 'रॅकेट' सक्रिय
विद्यापीठ : 'शॉर्टकट'च्या नादात फसताहेत विद्यार्थी
योगेश पांडे■ नागपूर
अभ्यास न करता 'शॉर्टकट' पद्धतीने गुण मिळविण्याचा प्रयत्न करणार्या अनेक विद्यार्थ्यांना चांगलाच फटका पडत असल्याची बाब समोर आली आहे. अभ्यास करण्याऐवजी कुठून विद्यापीठाच्या परीक्षेत येणारा पेपर मिळतो का याच्या शोधात असणार्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना जाळ्यात ओढणारे 'रॅकेट'च सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे 'रॅकेट'अंतर्गत कधी 'गेसिंग' तर कधी 'आयएमपी'च्या नावाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका विकण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्ष परीक्षेत पेपर समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण फसविल्या गेलो आहे याची जाणीव होत आहे. हे 'रॅकेट' केवळ पैसे कमविण्यासाठी सुरू आहे की यात विद्यापीठाची प्रतिष्ठा मलीन करण्याचा डाव आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे काही विषय कमकुवत असल्याने त्यांना पेपरमध्ये उत्तीर्ण होऊ की नाही याबाबत शाश्वती नसते. त्यामुळेच कुठल्या 'क्लास'मधून किंवा कोणत्या तज्ज्ञाकडून महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच 'आयएमपी' मिळते का याचा शोध सुरू असतो. काही महाभाग तर विद्यापीठाच्या परीक्षेत येणारा पेपर मिळतो का याची चाचपणी करत असतात. नेमका याचाच फायदा उचलून विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. एखाद्या 'कोचिंग क्लास'मधील किंवा महाविद्यालयाच्या 'सेशनल' परीक्षेचा पेपर घेऊन त्यालाच संभावित पेपर म्हणून विद्यार्थ्यांच्या हाती सोपविण्यात येते व याच्या बदल्यात पैसे उकळण्यात येतात. अभियांत्रिकीच्या जवळपास प्रत्येक पेपरमध्ये असे प्रकार होत असून प्रत्यक्ष परीक्षेत निराशा झाल्यानंतर विद्यार्थी पोलिसांत तक्रार करू शकत नाहीत. त्यामुळे ही प्रकरणे समोर येत नाहीत. यंदाच्या परीक्षांमध्ये असे प्रकार वाढले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.