Quarter to Three lakh farmers will be debt free in Nagpur region | नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त
नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अंदाज : प्रत्यक्ष लाभासाठी उजळणार एप्रिल महिना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु या योजनेचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल महिन्यापासून मिळणार असल्याचे संकेत आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यांनी ३० जून २०१६ पर्र्यंतच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला. या योजनेनुसार दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार असून, त्यावरील रक्कम एकमुस्त भरल्यास दीड लाखांचा लाभ मिळणार होता. या योजनेचा राज्यातील ८० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, ३० हजार कोटींच्यावर रक्कम मिळणार असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. जून २०१७ ला याचा आदेश काढला. गेल्या अडीच वर्षात ५० लाख शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. यामध्ये नागपूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकरी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. आजवर ५२ हजारच्या घरातच शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाखापर्यंतच्या कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर टीका झाल्यानंतर दोन लाखावरील व नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शासन आदेशानंतर प्रशासनाकडून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार नागपूर विभागात २ लाख ७८ हजार ७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळेल. सर्वाधिक ७५ हजार ३३६ शेतकरी वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ६० हजार ८७० शेतकरी पात्र ठरतील. सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ९३ शेतकरीच पात्र ठरतील. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात येणार असून, एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात किती जणांना याचा लाभ मिळतो, हे येणारी वेळच सांगेल.


जिल्हा                      राष्ट्रीयकृत बँक               जिल्हा मध्यवर्ती बँक
नागपूर                    ४९,४८९                       ४६२१
भंडारा                    १०,९८९                        २८,९७४
चंद्रपूर                     २३,२१६                       ३७,६५४
गोंदिया                    ११,०४१                        २०,३३३
गडचिरोली               १२,२२१                       ४८७२
वर्धा                         ७५,३३६                      ००
 

Web Title: Quarter to Three lakh farmers will be debt free in Nagpur region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.