क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 08:50 PM2020-08-07T20:50:37+5:302020-08-07T20:52:06+5:30

कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

Quarantine rules reduce plane passengers! | क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

क्वारंटाईन नियमांमुळे विमान प्रवाशी घटले!

Next
ठळक मुद्देगरजूच करताहेत प्रवास : अनेकांची रस्ता मार्गाला पसंती, एअर ट्रॅव्हल्स एजंटचा व्यवसाय ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. शासनाने १४ दिवसाची क्वारंटाईनची अट शिथिल केल्यास विमान प्रवाशांची संख्या वाढेल आणि विमान क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे मत एअर ट्रॅव्हल्स एजंटनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
परतीचे तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवाशाला क्वारंटाईन बंधनकारक नाही उदाहरण देताना एअर ट्रॅव्हल एजंट म्हणाले, नियमानुसार जर मुंबईचा प्रवासी कामानिमित्त विमानाने नागपुरात येत असेल आणि त्याच्याकडे तीन दिवसाच्या आतील परतीचे कन्फर्म तिकीट असेल तर त्याच्या हातावर नागपूर विमानतळावर क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात येणार नाही आणि अशा प्रवाशाला नागपुरात क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण प्रवाशाला नागपूर विमानतळावर प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल आणि त्याच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड असावा. हा प्रवासी मुंबईला परत गेल्यानंतर विमानतळावर त्याच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारण्यात येईल आणि त्याला १४ दिवसांसाठी घरी क्वारंटाईन राहावे लागेल. ही सुविधा कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक नसल्याने अनेकजण विमानाने प्रवास टाळत आहे. याच कारणाने प्रवाशांमध्ये घसरण झाल्याने एअर ट्रॅव्हल एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

विमाने होतात वेळोवेळी सॅनिटाईज्ड
पूर्वी नागपुरात ३४ ते ३५ विमाने यायची. कोरोना महामारीमुळे आता सहा विमाने नागपुरात येत आहेत. यातून ४० ते ५० टक्केच प्रवासी प्रवास करीत आहेत. या विमानातून नागपुरात दररोज जवळपास ४०० ते ४५० प्रवासी येतात आणि तेवढेच जातात. त्याचा विमान कंपन्यांनाही फटका बसला आहे. एअर ट्रॅव्हल एजंट म्हणाले, १४ दिवसाची क्वारंटाईनची अट प्रवाशांसाठी मोठी अडचण ठरली आहे. अडचणीविना प्रवास करण्याची त्यांची मागणी आहे. कन्फर्म तिकिटच्या अटीमुळे केवळ व्यावसायिक, मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी नागपुरात एक वा दोन दिवसात काम करून परत जातात. पण सर्वसाधारण प्रवासी नागपुरात येण्यास धजावत नाहीत. विमान कंपन्या शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करीत आहेत. विमाने वेळोवेळी सॅनिटाईज्ड करण्यात येत आहेत. शिवाय प्रवासीही काळजी घेत आहेत. ही सकारात्मक स्थिती असतानाही शासनाची क्वारंटाईनची अट नकोच, असे मत एअर ट्रॅव्हल्स एजंटनी व्यक्त केले.

एअर ट्रॅव्हल एजंट आर्थिक अडचणीत
आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत, शिवाय घरगुती विमान प्रवाशांची संख्या कमी झाल्याने अनेक एअर ट्रॅव्हल एजंटचे कार्यालय बंद झाले आहेत. जे सुरू आहेत, त्यांच्याकडे केवळ बोटावर मोजण्याएवढेच प्रवासी येत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्च व भाडे, बँकांच्या कर्जाचे हप्ते आदींचा ताळमेळ साधण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विमान प्रवाशांचे १४ दिवसाचे क्वारंटाईन बंधनकारक त्यामुळे एजंट आर्थिक अडचणीत आहेत. क्वारंटाईन रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने (टीएएआय) सरकारला दिले आहे. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही.

शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईन
नागपूर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहावे लागते. प्रवासी विमानतळावर येताच डॉक्टर्स त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का लावतात. ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या नियमानुसार सुरू आहे. पुढे नियमात बदल झाल्यास त्यानुसार प्रक्रिया राहील.
आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

गरजू प्रवासी येताहेत नागपुरात
क्वारंटाईनचा नियम आणि मर्यादित विमानांमुळे हवाई प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक एअर ट्रॅव्हल्स एजंटची कार्यालये बंद झाली आहेत. विमान कंपन्यांवर प्रवासी संख्येचे बंधन नाही. क्वारंटाईन संदर्भात प्रवाशांना केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
हरमनदीप सिंग आनंद, व्यवस्थापकीय संचालक, जॅक्सन ट्रॅव्हल्स.

Web Title: Quarantine rules reduce plane passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.