३० रेल्वे कोचमध्ये क्वॉरंटाईन सेंटर : मध्य रेल्वेचे ६५० कर्मचारी कोरोनाग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 21:51 IST2021-04-09T21:49:25+5:302021-04-09T21:51:26+5:30
Quarantine center in railway coaches उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता ३० रेल्वे कोचला ‘क्वॉरंटाईन’केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे.

३० रेल्वे कोचमध्ये क्वॉरंटाईन सेंटर : मध्य रेल्वेचे ६५० कर्मचारी कोरोनाग्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने संसर्ग होत आहे. ‘कोरोना’ची सध्याची स्थिती पाहता ३० रेल्वे कोचला ‘क्वॉरंटाईन’केंद्रामध्ये परावर्तित करण्यात आले आहे. नागपूरसह वर्धा व आमलामध्ये हे केंद्र आहेत. राज्य शासन व महानगरपालिकेच्या विनंतीवर ‘क्वारंटाईन’ केंद्र सामान्य जनतेला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी दिली. ‘ऑनलाईन’ पत्रपरिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी ‘लोकमत’ने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न केला. त्यावेळी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ६५० कर्मचारी ‘कोरोना’बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली. इटारसे ते बल्लारशाहपर्यंत असलेल्या नागपूर विभागात सद्यस्थितीत ६५० कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. ७५ कर्मचारी इस्पितळात उपचार घेत असून ४७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात २७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. रेल्वे इस्पितळात कार्यरत ८ डॉक्टर आणि १६ पॅरामेडिकल स्टाफला ‘कोरोना’च्या नियंत्रणासाठी मनपाच्या सेवेत देण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाºयांचा ‘कोरोना’पासून बचाव करण्यासंदर्भात सर्व उपाय केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.