न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; कंत्राटदार, महावितरणकडून २०० वर नागरिकांची अग्निपरिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:38 IST2025-10-26T22:37:06+5:302025-10-26T22:38:31+5:30
रात्री अंधार, मच्छर, हवा आणि पाणी नसल्याने होणारा 'शारिरिक कोंडमारा' वृद्ध नागरिक, महिला, मुलांना असह्य झाला.

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; कंत्राटदार, महावितरणकडून २०० वर नागरिकांची अग्निपरिक्षा
नागपूर : कंत्राटदाराच्या माणसांनी खोदकाम करताना वीज केबल तोडली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही कंत्राटदार अथवा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित २०० वर नागरिकांची कोणतीही मदत न केल्याने तब्बल २८ तास संबंधित फ्लॅटधारकांना प्रचंड शारिरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, नागरिकांच्या रोषाचा भडका उडण्याची स्थिती निर्माण झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा सुरू करून दिला.
प्रचंड संतापजनक असा हा प्रकार नरेंद्रनगर महावितरण कार्यालयाच्या क्षेत्रात शताब्दी चौक ते लोहार समाज भवन जवळ सरस्वती विहार कॉम्प्लेक्स येथील आहे. येथे चार टॉवर असून त्यात एकूण ५६ परिवार (दोनशेवर नागरिक) राहतात. या ईमारतीच्या बाजुला डीपी आहे.
डीपीच्या दोन्ही बाजुला गेल्या सहा महिन्यांपासून खोदो-बनाओ, फिर खोदो, असे प्रकार सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच या भागात एका बाजुला गट्टू लावण्यात आले. दुसऱ्या बाजुला पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे.
यापुर्वीही तेथे असेच खोदकाम करून रस्त्याची वाट लावल्यानंतर कंत्राटदाराने सिमेंटीकरण अथवा डांबरीकरण केले नव्हते. दरम्यान, शनिवारी सकाळी डीपीच्या बाजुला कंत्राटदारांच्या माणसांनी खोदकाम करताना वीजेची केबल डॅमेज केली. त्यामुळे सरस्वती विहार कॉम्प्लेक्सच्या ईमारतींचा वीज पुरवठा खंडीत झाला.
तास-दोन तास नागरिकांनी 'रुटीन जॉब' म्हणून त्याकडे बघितले. नंतर मात्र महावितरणकडे चौकशी, तक्रारी झाल्या. कंत्राटदाराने केबल तोडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगितले गेल्याने त्याच्याशीही संपर्क साधण्यात आला.
महावितरण आणि कंत्राटदाराकडून दिवसभर 'हो करून घेऊ' म्हणत दिवसभर टाईमपास झाला. सायंकाळनंतर मात्र उद्या सकाळी करू म्हणत हात झटकले. दरम्यान, टॉवरच्या टाक्यात भरलेल्या पाण्यात दिवसभर कशी बशी सोय झाली.
रात्री अंधार, मच्छर, हवा आणि पाणी नसल्याने होणारा 'शारिरिक कोंडमारा' वृद्ध नागरिक, महिला, मुलांना असह्य झाला. त्यांनी रात्रभर अग्निपरिक्षा द्यावी, तसा प्रचंड त्रास सहन केला. आज सकाळपासून नागरिकांचा रोष उफाळून येत असल्याचे बघून महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष घातले. पथक आले आणि दुपारी १२ च्या सुमारास तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा सुरू करण्यात आला.
दोष कुणाचा, शिक्षा कुणाला
दोनशेवर नागरिकांना वेठीस धरण्यास कंत्राटदाराच्या माणसांकडून झालेला हलगर्जीपणा कारणीभूत आहे. शिक्षा मात्र निर्दोष नागरिकांना मिळाली. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
आज केलेली तात्पुरती उपापयोजना महावतिरणच्या अधिकाऱ्यांनी शनिवारीच का केली नाही, असाही प्रश्न पीडित रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दोषी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशीही मागणी आहे.
काय होणार कारवाई?
या संबंधाने विचारणा केली असता महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी 'आज तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून सोमवारी सर्व सुरळीत होईल', असे सांगितले. दोषी कंत्राटदाराविरुद्ध काय कारवाई करणार, असा प्रश्न केला असता त्याच्याकडून झालेला खर्च भरून घेतला जाईल, अशी माहिती दिली.