नागपुरात उद्या वीज दरांवर होणार जनसुनावणी; महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध
By आनंद डेकाटे | Updated: February 9, 2026 18:55 IST2026-02-09T18:55:19+5:302026-02-09T18:55:55+5:30
Nagpur : महावितरणच्या वीजदर निर्धारण याचिकेबाबत मंगळवारी नागपुरात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

Public hearing on electricity rates to be held in Nagpur tomorrow; Strong opposition to Mahavitaran's petition
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्यावीजदर निर्धारण याचिकेबाबत मंगळवारी नागपुरात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आज, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सुरू होणाऱ्या या जनसुनावणीत ग्राहक संघटना महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध दर्शवतील, अशी अपेक्षा आहे.
आयोगातर्फे सोमवारी अमरावती येथे झालेली जनसुनावणी अवघ्या काही तासांत आटोपल्याने ग्राहक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या याचिकेवर तिसऱ्यांदा जनसुनावणी होत आहे. महावितरणने २०२५ ते २०३० या कालावधीसाठी वार्षिक वीजदर निश्चित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. आयोगाने जनसुनावणी घेऊन २८ मार्च २०२५ रोजी निर्णय देताना वीजदरांमध्ये सरासरी १० टक्क्यांची कपात केली होती. हा दर १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार होता.
मात्र, महावितरणने पुनर्विचार याचिका दाखल केली. आयोगाने २५ जून २०२५ रोजी नव्याने दर निश्चित केले, जे यापूर्वीच्या दरांपेक्षा अधिक होते. यावर ग्राहक संघटना आणि सौरऊर्जा व्यावसायिकांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देत २८ मार्च २०२५ रोजी निश्चित केलेल्या दरांनुसारच बिल आकारण्याचे निर्देश दिले. त्याविरोधात महावितरणने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयोग पुन्हा एकदा जनसुनावणी आयोजित करत आहे.