आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध; पोलिस तक्रारही दाखल
By योगेश पांडे | Updated: January 4, 2024 21:07 IST2024-01-04T21:06:53+5:302024-01-04T21:07:38+5:30
जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक

आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध; पोलिस तक्रारही दाखल
नागपूर : राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजपने तीव्र निषेध केला. भाजपतर्फे महाल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तहसील पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली.
महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ. प्रवीण दटके, शहर सरचिटणीस रामभाऊ अंबुलकर, अर्चना डेहनकर, भाजयुमो शहराध्यक्ष बादल राऊत, श्रीकांत आगलावे, सागर घाटोळे, आशिष मोहिते, सौरभ पाराशर, श्रेयस कुंभारे, रुपेश रामटेककर, गुड्डू पांडे, डिम्पी बजाज, पतिव्रता शर्मा, यशवंत पाटील आदी उपस्थित होते. भाजप महिला मोर्चा पूर्व नागपूरच्या वतीने नंदनवन पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. तेथे सीमा ढोमणे, मनीषा धावडे, आम्रपाली मेश्राम आदी उपस्थित होते.
शिवसेनेकडूनदेखील आंदोलन
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पक्षाच्या धंतोली कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्या नेतृत्वाखाली चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन केली. शिवसेना शहरप्रमुख धीरज फंदी, युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश तिघे, सचिन यादव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.