पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू; आतापर्यंत १,२२,२३३ मतदारांची नोंदणी
By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 19:09 IST2025-11-08T19:08:08+5:302025-11-08T19:09:47+5:30
पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Process of preparing new lists for graduate constituencies begins; 1,22,233 voters registered so far
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागात आतापर्यंत १ लाख २२ हजार २३३ मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे. यापैकी ९५,५०० प्रत्यक्ष, तर २६,७३३ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत १ लाख २२ हजार २३३ अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये नागपूर जिल्ह्यातून ४० हजार ४४८, वर्धा १३ हजार ०४२, भंडारा १४ हजार ४१४, गोंदिया १८ हजार १३९ चंद्रपूर २४ हजार ५०९, तर गडचिरोली जिल्ह्यातून ११ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, नोंदणीकरिता विहित फाॅर्म (नमुना-१८ व नमुना-१९) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले आहे. २५ नाव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. मतदारांची यादी ३० डिसेंबर, २०२५ रोजी प्रसिद्ध होईल.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अद्यापपर्यंत अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधरांनी तत्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
निवडणूक जाहीर होईपर्यंत करता येणार नोंदणी
६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांनी मतदार नोंदणी केली, त्यांची प्रारूप यादी ३० डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. पदवीधर मतदारांना निवडणूक जाहीर होईपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. निवडणूक जाहीर व्हायला अजूनवेळ असला, तरी पदवीधर मतदारांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.