कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:52 IST2023-06-10T20:52:22+5:302023-06-10T20:52:47+5:30
Nagpur News अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. श्यामराव ऋषीजी शेंडे (वय ४०, मुडझा, जि. गडचिरोली) असे गळफास घेतलेल्या कैद्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामराव शेंडे हा शेती करायचा. लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने पत्नीला मारहाण करून तिला अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले होते. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. जवळपास १२ वर्षे ती माहेरी राहिल्यानंतर तिला गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याने पुन्हा आपल्या घरी आणले होते.
दोन वर्षे संसार केल्यानंतर पत्नीचे पुन्हा अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने २०२० मध्ये कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केला. गेल्या दोन वर्षांपासून तो चंद्रपूर कारागृहात होता. त्याला १३ एप्रिल रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महिन्याभरापूर्वी त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. जन्मठेप झाल्यामुळे तो नैराश्यात गेला. उर्वरित आयुष्य कारागृहातच काढावे लागणार या भीतीमुळे तो चिंतेत राहत होता. शनिवारी सकाळी अकरा वाजता कारागृहाच्या रंगकाम करण्याच्या भिंतीच्या खिडकीला पायजामाच्या नाड्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. अर्ध्या तासाने ही बाब एका कैद्याच्या लक्षात आली. त्यांनी कारागृह अधिकाऱ्यांना माहिती दिली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
.........