चारचाकीच्या धडकेने पुजाऱ्याचा मृत्यू; अमरावती-नागपूर महामार्गावरील अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 20:12 IST2023-03-02T20:12:22+5:302023-03-02T20:12:53+5:30
Nagpur News वेगात येणाऱ्या फॉर्च्युनरने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव शिवारात गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

चारचाकीच्या धडकेने पुजाऱ्याचा मृत्यू; अमरावती-नागपूर महामार्गावरील अपघात
नागपूर : वेगात येणाऱ्या फॉर्च्युनरने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव शिवारात गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
भीमराव भांडेकर (६५, रा. विकासनगर, कोंढाळी, ता. काटाेल) असे मृत दुचाकीचालक पुजाऱ्याचे नाव आहे. ते हनुमानभक्त असल्याने विकासनगर, काेंढाळी येथील मंदिरात राेज सकाळी पूजा, आरती, भजन व इतर धार्मिक कार्य नियमित करायचे. त्यांनी गुरुवारी सकाळी मंदिरातील धार्मिक विधी आटाेपले आणि पेट्राेल खरेदी करण्यासाठी एमएच-४०/एबी-७५०३ क्रमांकाच्या दुचाकीने पेट्राेल पंपावर गेले. पेट्राेल खरेदी केल्यानंतर ते याच दुचाकीने काेंढाळीच्या दिशेने यायला निघाले.
दरम्यान, साेनेगाव शिवारात अमरावतीहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या सीजी-०४/एनई-९९८१ क्रमांकाच्या फॉर्च्युनरने त्यांच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यामुळे भीमराव दुचाकीसह रस्त्यावर काेसळल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना जखमी अवस्थेत काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले.
तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काेंढाळी येथे शाेककळा पसरली हाेती. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी फॉर्च्युनर चालक रामप्रसाद तुलसीराम बघेल (३४, रा. रायपूर, छत्तीसगड) याच्याविराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.