मोरेश्वर मानापुरे, नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे देशांतर्गत सोन्याच्या भावात निरंतर वाढ होत आहे. नागपूर सराफा बाजारात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १,२०० रुपये आणि प्रति किलो चांदी एक हजार रुपयांनी वाढली. वाढत्या दरासोबतच गुंतवणुकीवर परतावा मिळेल, या आशेने ग्राहक सोन्यात पैसे गुंतवत आहेत.
सोमवार, ३ मार्चला बंद बाजारात सोने ८५,६०० आणि चांदीचे दर ९५,४०० रुपयांवर स्थिरावले. मंगळवारी सकाळी खुलत्या बाजारात सोने ५०० रूपयांनी वाढून ८६,१०० तर चांदी ४०० रुपयांच्या दरवाढीसह ९४,८०० रुपयांवर पोहोचली.. दुपारी १ च्या सुमारास सोने आणि चांदीत अनुक्रमे २०० रुपयांची वाढ झाली. दुपारी अडीच्या सुमारास सोने ३०० आणि चांदीचे भाव २०० रुपयांनी वाढले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मागणी वाढताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या. सोने १०० रुपयांनी वाढून ८६,८०० आणि चांदीत २०० रुपयांनी वाढ होऊन भावपातळी ९६,४०० रुपयांवर पोहोचली. ३ टक्के जीएसटीसह सराफांच्या दुकानात दहा ग्रॅम सोने ८९,४०४ रुपये आणि ९९,२९२ रुपयांत किलो चांदीची विक्री झाली.