देशात प्रथमच नाकावाटे लसीची मानवी चाचणीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:40+5:302021-01-08T04:23:40+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : नाकावाटे शरीरात घेता येईल, अशा कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी देशात पहिल्यांदाच चार ठिकाणी सुरू ...

Preparation of human test for nasal vaccine for the first time in the country | देशात प्रथमच नाकावाटे लसीची मानवी चाचणीची तयारी

देशात प्रथमच नाकावाटे लसीची मानवी चाचणीची तयारी

सुमेध वाघमारे

नागपूर : नाकावाटे शरीरात घेता येईल, अशा कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी देशात पहिल्यांदाच चार ठिकाणी सुरू होणार आहे. यात राज्यातून नागपूरचा गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश असणार आहे. भारत बायोटेक कंपनीची नाकावाटे देणारी कोव्हॅक्सिनची ही लस थेट फुप्फुसांपर्यंत पोहोचते. यामुळे अधिक चांगल्याप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा दावा केला जात आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या निदानाने एकीकडे खळबळ उडाली असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे ‘ड्राय रन’ यशस्वी झाले आहे. यातच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजी) भारतात दोन कोरोनाविरोधी लसींना आपत्कालीन परवानगी दिली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ तर भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस आहे. भारतात तयार झालेली ‘कोव्हॅक्सिन’ही पहिली स्वदेशी लस आहे. हीच लस आता नाकावाटे देण्याची चाचणी जगात पहिल्यांदाच होऊ घातली आहे. आतापर्यंत झालेल्या चाचणीत ‘इंट्रा व्हॅस्कुलर’ म्हणजे धमनीमध्ये दिली जात होती. या लसीचा पहिला व दुसरा टप्पा राज्यात नागपुरातील डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये पार पडला. पहिल्या टप्प्यात ५५, तर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात आली. तिसरा टप्पा रहाटे खासगी हॉस्पिटलमध्ये झाला. यात १६००वर स्वयंसेवकांना लस देण्यात आली. दरम्यानच्या काळात नागपुरातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्वचेद्वारे म्हणजे, ‘इंट्राडर्मल’ लसीची चाचणी २० स्वयंसेवकांवर झाली. विशेषत: पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल चांगले आले. यामुळेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचा चाचणीसाठी पुन्हा नागपूरच्या हॉस्पिटलची निवड झाली, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिल्लूरकर यांनी दिली.

-ॲंटिबॉडीज जास्त पटीने तयार होतात

डॉ. गिल्लूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोरोना व्हायरसमुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. कारण कोरोनाचा विषाणू नाक, घसा याद्वारे थेट फुप्फुसांत पोहोचतो. त्यामुळे अस्थमासारख्या उपचार पद्धतीने म्हणजे थेट नाकावाटे लस फुफ्फुसात सोडली गेली, तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ‘इंट्रा व्हॅस्कुलर’ च्या तुलनेत नाकावाटे देण्यात आलेल्या लसीमुळे ॲंटिबॉडीज जास्त पटीने तयार होतात, असे संशोधनातून सामोर आले आहे. यापूर्वी नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणामध्ये स्वाईन फ्लूची लस होती.

-भारताची गरज लक्षात घेता, नाकावाटे दिली जाणारी लस फायद्याची

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमुळे सिरिंज व इतर साहित्याचा खर्च कमी होतो. ही लस देणे सहज सोपे आहे. यामुळे लसीकरणात याचा मोठा फायदा होऊ शकतो. उपलब्ध माहितीनुसार, जवळपास २ कोटी कोव्हॅक्सिनचे ‘इंट्रा व्हॅस्कुलर’, तर कोव्हिशिल्डच्या सुमारे ४ ते ५ कोटी लस तयार झाल्या आहेत, परंतु भारताला पहिल्या टप्प्यात व्यापक प्रमाणात लसीकरणासाठी ७० ते ८० कोटी लसीची गरज आहे. यावर वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जात असताना नाकावाटे दिल्या जाणारी ही लस प्रभावी ठरू शकते, असेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.

-३७५ स्वयंसेवकांवर चाचणी

नाकावाटे कोव्हॅक्सिन लसीचा मानवी चाचणीसाठी भारत बायोटेकने ‘डीसीजी’कडे परवानगी मागितली आहे. मंजुरी मिळातच साधारण दोन आठवड्यांत चाचणीला सुरुवात होईल. भारतात चार केंद्रांवर याची चाचणी होणार आहे. यात नागपूर, हैदराबाद, भुवनेश्वर व पटणा या केंद्रांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात ३७५ स्वयंसेवकांवर ही चाचणी होईल. नागपूर सेंटरवर यातील ७० ते ८० स्वयंसेवकांच्या चाचणीची धुरा येऊ शकते. १८ ते ५५ वयोगटात ही चाचणी दोन टप्प्यात घेतली जाईल.

-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर

संचालक, गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

Web Title: Preparation of human test for nasal vaccine for the first time in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.