पॅन कार्ड उलगडणार प्रीतीची मोहमाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:07 IST2020-06-19T22:05:43+5:302020-06-19T22:07:41+5:30
अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात.

पॅन कार्ड उलगडणार प्रीतीची मोहमाया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात. पोलिसांनी तिच्या दोन पॅन कार्डबाबतची माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविली आहे. त्यामुळे आर्थिक मालमत्तेसोबतच प्रीतीच्या मोहमाया यात अडकून कुणी आपले काळे धन आणि आतबट्ट्याचे आर्थिक व्यवहार मार्गी लावत होते काय, त्याचाही खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
प्रीती दास हिच्याकडे दोन पॅनकार्ड असल्याचा खळबळजनक खुलासा लोकमत'ने गुरुवारी १८ जून रोजी केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांच्या नजरा तिकडे वळल्या. पाचपावली पोलिसांनी गुरुवारी प्राप्तिकर खात्याला तिच्याकडे दोन पॅन कार्ड असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे कळविली, असे पाचपावली पोलीस सांगतात. त्यामुळे आता पोलिसांसोबतच प्रीतीला प्राप्तिकर खात्याच्या चौकशीचाही सामना करावा लागू शकतो. असे झाल्यास प्रीतीने अनेकांना फसवून, धमकावून, ब्लॅकमेल करून कोट्यवधींची माया गोळा केली ती तिने कुठे ठेवली त्याचाही उलगडा होऊ शकतो. याशिवाय दोन पॅनकार्डचा वापर ती कोणत्या हेतूने करायची,याचेही कोडे सुटू शकते. तिचे काही कथित नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याचे आजवरच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या नेत्यांची काळी कमाई प्रीती गौरी बनून मार्गी लावायची की पाटलीण बनून आर्थिक कारभार करायची, याचासुद्धा उलगडा होणार आहे.
अनेक बँकांमध्ये प्रीतीची खाती
प्रीतीची अनेक बँकांमध्ये खाती असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेसोबतच दोन खासगी बँकांमध्येही तिचे खाते असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी नागपुरातील जवळपास सर्वच बँकांना पत्र देऊन प्रीती दास हिचे आपल्याकडे खाते आहे का, अशी विचारणा केली आहे.
बँकेत लॉकरही असल्याची सूत्रांची माहिती आहे पोलीस मात्र आपल्याकडे अशी माहिती उघड झाली नसल्याचे सांगतात.