घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:53 IST2025-09-18T15:51:52+5:302025-09-18T15:53:25+5:30

रूपाली चाकणकर : राज्य महिला आयोगाचा पुढाकार

Pre-marriage counseling centers to be opened at ten places in the state to reduce the rate of divorce | घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर

Pre-marriage counseling centers to be opened at ten places in the state to reduce the rate of divorce

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कुटुंबातील विवाहित जीवन अधिक सुदृढ आणि समजूतदार बनवण्यासाठी राज्य महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाच्या पुढाकाराने राज्यात १० ठिकाणी प्रायोगिक तत्वावर 'प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर' सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे दिली.

राज्य महिला आयोगाच्या सुनावणीसाठी त्या नागपुरात आल्या असा नियोजन भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ, विपीन इटनकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार प्रामुख्याने उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या की, "लग्नपूर्व समुपदेशनाच्या माध्यमातून युवक-युवतींना वैवाहिक आयुष्याचे भावनिक, मानसिक आणि सामाजिक पैलू समजावून सांगण्यात येतील. या केंद्रांमुळे विवाहानंतर उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना प्रतिबंध करता येईल आणि घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई नाशिक आदी दहा निवडक जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ही केंद्र विधि सेवा केंद्रामध्ये आहेत. तेथे तज्ज्ञांद्वारे समुपदेशन केले जाणार आहे.

राज्य महिला आयोगातर्फे प्रत्येक जिल्ह्यात सुनावणी घेतली जात आहे. आयोगाकडे येणाऱ्या राज्यभरातील तक्रारींचा विचार केला तर नागपूर विभागात तुलनेने कमी तक्रारी आहेत. नागपूर विभागातील भरोसा सेल व वन स्टाॅप सेंटरचे काम चांगले असल्यानेच या तक्रारी कमी असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

महिलांच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत समितीचे ऑडीट होणार

महिलांवरील लैंगिक छळप्रकरणांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक कार्यक्षेत्रात एक अंतर्गत समिती कार्यरत आहे. ही समिती अधिक ॲक्टीव्ह व्हावी, यासाठी या समितीचे ऑडीट करण्यावर आयोगाचा यापुढे भर राहील, असेही चाकणकर यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शाळांमध्ये शिक्षकांनी पालकांसोबतच विद्यार्थीिनींशी अधिक संवाद साधावा, या दृष्टीनेही महिला आयोग काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना पोलीस किंवा न्यायालयात तक्रार करायची नसेल तर त्यांनी थेट भरोसा सेलकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Pre-marriage counseling centers to be opened at ten places in the state to reduce the rate of divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.