विदर्भातील ५,८०८ शेतकऱ्यांना वीजपुरवठा : ३,०१७ किमी लांबीची वीजवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 08:29 PM2019-08-01T20:29:09+5:302019-08-01T20:30:38+5:30

शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संपूर्ण विदर्भात आतापर्यंत सुमारे ५,८०८ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यासाठी तब्बल ३,०१७ किमी लांबीची उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यात आली आहे.

Power supply to Vidarbha's farmers: 3017 km long cable line | विदर्भातील ५,८०८ शेतकऱ्यांना वीजपुरवठा : ३,०१७ किमी लांबीची वीजवाहिनी

विदर्भातील ५,८०८ शेतकऱ्यांना वीजपुरवठा : ३,०१७ किमी लांबीची वीजवाहिनी

Next
ठळक मुद्देउच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संपूर्ण विदर्भात आतापर्यंत सुमारे ५,८०८ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यासाठी तब्बल ३,०१७ किमी लांबीची उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यात आली आहे.
पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गती दिली. त्यानुसार मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या विदर्भातील ४२ हजार शेतकऱ्यांसह राज्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार असून, यापेक्षा अधिक खर्च येणाऱ्या राज्यातील तब्बल ३३ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता ५ हजार ४८ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १० व १६ केव्हीएचे सुमारे १ लाख ३० हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.
राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीची कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यात ही योजना फुल-टर्न की व पार्शियल-टर्न की अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ही कामे फुल-टर्न की तत्त्वावर देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये ६०० एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह १०० टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.
विदर्भातील एकूण ५ हजार ८०८ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज जोडणी देण्यात आल्या असून तब्बल ८ हजारावर वितरण रोहित्रे उभारण्यात आली आहेत. उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा वीज पुरवठा मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या
अकोला ७४३
बुलडाणा ७१६
वाशीम ५७१
अमरावती ५४४
यवतमाळ ८४६
चंद्र्रपूर २९१
गडचिरोली २३३
भंडारा ३६९
गोंदिया ५५१
नागपूर ६८८
वर्धा २५६
----------------
एकूण ५,८०८

Web Title: Power supply to Vidarbha's farmers: 3017 km long cable line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.