‘पॉवर पॉलिटिक्स’ने देशाचे नुकसान केले
By Admin | Updated: July 21, 2014 00:49 IST2014-07-21T00:49:51+5:302014-07-21T00:49:51+5:30
गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे.

‘पॉवर पॉलिटिक्स’ने देशाचे नुकसान केले
नितीन गडकरी : समाजकारण हेच राजकारणाचे स्वरूप
नागपूर : गेल्या काही वर्षांत राजकारणाची व्याख्याच काही नेत्यांनी बदलवून टाकली आहे. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ झाले आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही सातत्याने केवळ सत्ताकारणावरच लिहित आहे. मुळात राजकारण हे सेवेचे आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेले क्षेत्र आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे नेते मोठे होत नाही. पण काहीही न करता माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती देत फिरणारे लोक मोठे नेते होतात, याची खंत वाटते. या ‘पॉवर पॉलिटिक्स’नेच आपल्या देशाचे खरे नुकसान केले आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
साई सभागृहात आयोजित डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सेवा कार्य पुरस्कार समारंभात ते बोलत होते. ‘पॉवर पॉलिटिक्स’मुळे छळवाद, अप्रामाणिकता, भ्रष्टाचार यांनाच महत्त्व मिळत आहे.
प्रामाणिक सेवाभावींना महत्त्व दिले जात नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे स्वरूप म्हणजे राजकारण आहे. पण जनतेच्या सेवांविषयी काही बोलले तर दिल्लीत कुणाला पटतच नाही. विचारभिन्नता हे जिवंतपणाचे लक्षण आहे, त्याचे स्वागत करायला हवे. पण हल्ली विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता आली आहे, त्याची चिंता वाटते. स्वातंत्र्यापूर्वी विशिष्ट विचारांनी समर्पित होऊन काम करणारी पिढी होती. आता अशी माणसे फारच कमी झाली आहेत. जॉर्ज फर्नांडिस समाजवादी विचारांचे नेते आहेत, पण मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणी शंका घेत असेल तर या देशात कुणीच प्रामाणिक नाही. समाजवादाने अनेक मोठे नेते या देशाला दिले आहेत.
जातीच्या नावावर काही लोक निवडून येतात आणि ते जातीसाठी काहीच करीत नाही. स्वत:च्या कुटुंबातील लोकांना फारतर पदे मिळवून देतात. हे बदलले पाहिजे. सध्या जी विचारशून्यता आली आहे त्यात प्रत्येक संस्था, संघटनेने स्वत:ची वैचारिक भूमिका ठरविण्याची गरज आहे. काळसापेक्षता स्वीकारली पाहिजे.
आता भाजपात अनेक लोक यायला तयार आहेत; कारण त्यांना सातत्याने सत्तेच्या जवळ राहायचे आहे. आमची सत्ता गेल्यावर ते बाहेर पडतील. हे लोक ना डावे आहेत ना उजवे. त्यांना कुठलाच विचार नाही, ते केवळ ‘अपॉर्च्युनिस्ट’ आहेत. आता यातून कुणाला थांबवावे आणि कुणाला नाही हा प्रश्न आहे, असे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)