पावसामुळे अनेक भागातील बत्ती गुल; ट्रान्सफॉर्मर खराब, विजेच्या तारावर फांद्या पडल्या
By आनंद डेकाटे | Updated: April 2, 2025 20:53 IST2025-04-02T20:53:03+5:302025-04-02T20:53:16+5:30
महावितरणचे मोठे नुकसान रात्री उशिरा शहराला अवकाळी पावसाने झोडपले.

पावसामुळे अनेक भागातील बत्ती गुल; ट्रान्सफॉर्मर खराब, विजेच्या तारावर फांद्या पडल्या
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहराची वीज वितरण व्यवस्था कोलमडली. अनेक भाग अंधारात बुडाले होते. बुधवारी सकाळी काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला.
रात्री उशिरा शहराला अवकाळी पावसाने झोडपले. याचा वीज वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अनेक ट्रान्सफॉर्मर खराब झाले. झाडांच्या फांद्या तुटून विद्युत खांब व तारांवर पडल्या. वाडी परिसरातील खांबावर लागलेली डिस्ट खराब झाली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. खांब वाकडे झाले. मोठ्या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणला पुरवठा बंद करणे भाग पडले. पाऊस ओसरल्यानंतर महावितरणचे कर्मचारी कामाला लागले. रात्री उशिरापर्यंत बहुतांश भागात पुरवठा सुरळीत झाला. मात्र बेसा, रामटेके नगर, म्हाळगी नगर येथील अनेक भागात बुधवारी सकाळपर्यंत वीज नव्हती. दरम्यान, महावितरणकडून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.
प्रभावित परिसर
महावितरणच्या महाल विभागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वाडी, दत्तवाडी आदी भागांनाही मोठा फटका बसला. पार्वती नगर, रामेश्वरी, अभय नगर, बेसा, मानेवाडा, रामबाग, महाल, सक्करदरा, नवीन सुभेदार, जानकी नगर, भगवान नगर, उमरेड रोड, सूतगिरणी. वाठोडा, बगडगंज, श्रीकृष्ण नगर, वाडी, त्रिमूर्ती नगर, छत्रपती नगर, सोमलवाडा, मनीष नगर या भागातील वीज पुरवठा अनेक तास ठप्प होता.
मेडिकल परिसरातील केबलमध्ये आग
मेडिकल कॉलेजच्या भिंतीजवळ येणाऱ्या केबलला जास्त भार आल्याने आग लागली. त्यामुळे वंजारी नगर व मेडिकलच्या आसपासच्या इतर भागात बुधवारी दुपारी अनेक तास वीज नव्हती. याशिवाय महाल विभागात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या १०० हून अधिक वैयक्तिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.