सत्तांतर करणारे नेते बुडत्या जहाजातील उंदरांसारखे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 09:01 PM2019-09-01T21:01:43+5:302019-09-01T21:05:42+5:30

नितीन गडकरी : ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ‘चे थाटात लोकार्पण

Power leaders are like rats in a drowning ship | सत्तांतर करणारे नेते बुडत्या जहाजातील उंदरांसारखे 

सत्तांतर करणारे नेते बुडत्या जहाजातील उंदरांसारखे 

Next
ठळक मुद्दे‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ‘ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी थाटात लोकार्पण झाले. विदर्भातील ५२ राजकीय नेत्यांचा जीवनप्रवास या ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. 

नागपूर - आजच्या राजकीय नेत्यांना राजकारणाचा खरा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाचा अर्थ सत्ताकारण असाच गृहित धरण्यात येतो व लोक सत्तेच्याच मागे धावतात. ज्याप्रमाणे जहाज बुडताना सर्वात अगोदर उंदीर बाहेर पडतात, त्याचप्रमाणे सत्ता बदलली की अनेक जण पक्ष बदलतात. परंतु ही योग्य गोष्ट नाही. असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाही, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवरच प्रहार केला आहे. ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ‘ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी थाटात लोकार्पण झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
या विशेष समारंभाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, वन व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, ‘हितवाद’चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्याअगोदर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी सत्ताकारण नव्हे तर समाजकारण, राष्ट्रकारण व विकासकारण केले. आज याच गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु राजकीय नेते सत्तेच्याच मागे धावतात. आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहून राजकारण्यांकडून संयम ठेवला गेला पाहिजे. राजकारणात असताना विचारभिन्नता असणे स्वाभाविक आहे. परंतु आजच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांनी कधीच कुणासमोर झुकण्याची आवश्यकता नाही. इतिहास हा लोडावर टेकून अत्तराचा सुगंध घेत लिहिला जात नाही. तर तो परिश्रमाच्या घामाच्या धारांनी लिहिला जातो. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकट मारण्याच्या फंदात पडू नका. चौकटीबाहेर जाऊन विचार करायला हवा. पोस्टर्स, बॅनर लावून लोक कधीच निवडून देत नाहीत, असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादवीवार, दिलीप तिखिले, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. सुरेश द्वादशीवार यांनी प्रास्ताविक केले तर विकास मिश्र यांनी आभार मानले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले. विदर्भातील ५२ राजकीय नेत्यांचा जीवनप्रवास या ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. 

स्वत:च्याच सासऱ्यांचे घर तोडण्याचे दिले निर्देश
यावेळी नितीन गडकरी यांनी राजकारणाच्या माध्यमातून विकास साधत असताना नातेसंबंधांना कसे दूर ठेवायचे याचे उदाहरण सांगितले. रामटेकमधील मार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू होते. या मार्गात माझ्या  सासऱ्यांचे घर येत होते. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी त्याला हात लावला नव्हता. शेवटी मीच घर तोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. हा मार्ग होणे अत्यावश्यक होते. या पावलामुळे इतर लोकदेखील स्वत:हूनच बाजूला झाले, असे गडकरी यांनी सांगितले.   

Web Title: Power leaders are like rats in a drowning ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.