लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लगतच्या राज्यात आलेल्या बर्ड फ्लूमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मधारकांची चिंता चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात सध्या कुठेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, मात्र कावळे, पोपट, कबूतर, मैना या सारखे पक्षी मृतावस्थेत आढळल्याने हे व्यावसायिक धास्तावले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ५ हजार क्षमतेचे १५० पोल्ट्री फार्म असून त्यापेक्षा लहान क्षमतेचेही फार्म आहेत. या सर्व ठिकाणांवरील कोंबड्या आणि अंडी विक्रीसाठी बाजारात मोठ्या संख्येने येत असतात. लगतच्या जिल्ह्यातही त्यांची विक्रीसाठी वाहतूक होत असते. मात्र आठवडाभरापासून बर्ड फ्लू चर्चेने या व्यवसायावर परिणाम जाणवायला लागला आहे. जिल्ह्यात अद्याप कुठेच कोंबड्यांच्या मृत्यूसंदर्भात नोंद नाही, मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शीघ्र प्रतिसाद दलाच्या (आर.आर.टी.) १४ टीम तयार केल्या आहेत. त्यांना जिल्हा व तालुका पातळीवर प्रशिक्षणही देण्यात आले आहे. विदर्भ पोल्ट्री असोसिएशनच्या माध्यमातून सर्व पोल्ट्रीफार्म धारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.
...
पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी
सहआयुक्त पशुसंवर्धन (रोग अन्वेषण विभाग) यांनी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, पक्षी मृत झाल्यावर फार्मबाहेर नेऊन शवविच्छेदन करणे, मृत पक्ष्यांना खड्ड्यात चुना टाकून पुरणे किंवा एकत्रितपणे पक्षांना जाळणे, फार्मचे सॅनिटायजेशन करणे व नियमितपणे स्वच्छता राखणे, पक्ष्यांच्या मृत्यूसंदर्भात माहिती कळल्यास तातडीने पशुसंवर्धन कार्यालयाला माहिती देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे.
...
वाहतुकीला बंदी, विक्रीला नाही
जिल्ह्यात कोंबड्यांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र विक्रीला बंदी नाही. त्यामुळे विक्रीयोग्य वजनाच्या कोंबड्या वाहतुकीशिवाय विकायच्या कशा, त्या किती दिवस फार्ममध्येच ठेवणार, असा प्रश्न या व्यावसाियकांना पडला आहे. सध्यातरी कोंबड्यांच्या मागणीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र वाहतुकीला असलेली बंदी या व्यवसायाच्या मुळावर उठू पहाणारी आहे.
...
कोट
जिल्ह्यात अद्याप कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण असल्याचे प्रकरण नाही. उपाययोजना म्हणून आर.आर.टी. टीमची (शिघ्र प्रतिसाद दल) स्थापना केली असून सर्वांचे प्रशिक्षण झाले आहे. सर्व पोल्ट्री फार्म धारकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कळविले आहे.
- डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नागपूर
...