नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट, शिवसेना उपशहरप्रमुखाला धमकी
By योगेश पांडे | Updated: August 18, 2022 00:55 IST2022-08-18T00:54:22+5:302022-08-18T00:55:38+5:30
त्यांनी १५ ऑगस्टच्या निमित्ताने फेसबुकवर ‘स्टोरी’ पोस्ट केली होती.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट, शिवसेना उपशहरप्रमुखाला धमकी
नागपूर: भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या शिवसेनेच्या उप शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लॉरेन्स ग्रेगरी असे शिवसेनेच्या उप शहरप्रमुखाचे नाव असून ते मोहननगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी १५ ऑगस्टच्या निमित्ताने फेसबुकवर ‘स्टोरी’ पोस्ट केली होती. यात त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीचवर भाष्य केले होते. देशात जर खरोखरच फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर मग नुपूर शर्माने काय चुकीचे वक्तव्य केले, असे त्यात लिहिण्यात आले होते. यावर लॉरेन्स यांच्या मोहननगर येथील घरी अज्ञात व्यक्तीने दगडाला कागद गुंडाळून फेकला.
ग्रेगरी यांनी कागद उघडला असता त्यात लाल शाईने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ग्रेगरी यांनी तातडीने शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन तिवारी यांना ही माहिती दिली. तिवारी यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित फोटो पाठविले. ग्रेगरी यांनी सदर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.