नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:00 AM2020-08-02T00:00:59+5:302020-08-02T00:02:15+5:30

कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pollution of 'Mask' traps the environment in Nagpur | नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळेपर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापडाचे वगळता इतर सर्व प्रकारच्या मास्कमध्ये प्लास्टिकचा अंश असतो आणि योग्यरीतीने नष्ट केले नाही तर अनेक वर्षे वातावरणात राहतो. त्याचे कलेक्शन व नष्ट करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे हा प्रदूषणाचा विळखा अनेक वर्ष त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रीन व्हिजिलचे संयोजक व पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी मास्कच्या धोक्याकडे लक्ष वेधले. मास्कचा समावेश बॉयोमेडिकल वेस्टमध्ये होतो. सध्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता इतरांच्या मास्कशी संपर्क येणे धोक्याचे कारण ठरू शकते. कोरोना काळातील मास्क आणि हातमोजे हे जैविक कचºयाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना जैविक कचऱ्यासोबत गोळा करणे अपेक्षित आहे. शहरात सुपर हायजेनिक संस्थेद्वारे रुग्णालयातील जैविक कचरा गोळा करण्यात येतो, मात्र असाच घरातील कचरा गोळा होत नाही. त्यासाठी शहरातील कचरा उचल करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे जैविक कचरा स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक असंवेदनशील माणसे कुठेही मास्क फेकतात. या प्रदूषित मास्कमुळे इतरांना किंवा प्राण्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. दुसरीकडे काही लोक तो कचºयाच्या डब्यात जमा करतात, पण तो घरगुती कचºयासोबतच टाकला जातो. पुढे भांडेवाडीमध्ये तो जमा केला जातो किंवा जाळला जातो. ही व्यवस्थासुद्धा प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आहे. रिक्षाप्रमाणे ओढणाऱ्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्यामध्ये जैविक कचरा गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्थासुद्धा नाही. अशा अनेक अडचणींमुळे मास्कचा हा जैविक कचरा येत्या काळात अधिक अडचणीचा ठरण्याची भीती कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे पॉलिप्रॉपिलीन व त्याचा धोका?
कापडाचे मास्क वगळता इतर सर्व प्रकारचे मास्क हे ‘पॉलिप्रॉपिलीन’चा वापर करून तयार केले जातात. पॉलिप्रॉपिलीन हा प्लास्टिकचा असा घटक आहे ज्याचे सहजासहजी विघटन होत नाही. काही वर्षानंतर याचे मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या कणांमध्ये रूपांतर होते. हे कण तलाव किंवा इतर जलसाठ्यात मिसळले तर तेथील सजीवांना धोकादायक आहेत. मात्र हे प्लास्टिक कण शेतात मिसळले तर माणसाच्या अन्नात पोहचण्याचा धोका आहे. हा घटक अनेक वर्षे वातावरणात राहत असल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.

असा नष्ट करावा कचरा
चटर्जी यांनी सांगितले, नागरिकांनी सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणे मास्क व ग्लोव्हज स्वतंत्रपणे जमा करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही तो वेगळाच गोळा करावा. हा कचरा नष्ट करण्यासाठी भांडेवाडीत नेऊ नये. त्यापेक्षा रुग्णालयातील कचरा जिथे जातो, तेथे नेला जावा. या ठिकाणी
इन्सिनरेटरमध्ये ८०० ते ११०० डिग्री तापमानात तो जाळला जावा. धूर बाहेर जाऊ नये म्हणून क्लीन डिव्हाईस लावणेही गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
शहरातून दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात १५० ते २०० मेट्रिक टन प्लास्टिक वेस्ट असते. यात मास्क, ग्लोव्हजच्या कचऱ्याची भर पडली आहे.

Web Title: Pollution of 'Mask' traps the environment in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.