राजकारण, समाजकारणातील मूल्य शिकविणारा लोकनेता
By Admin | Updated: September 26, 2016 03:10 IST2016-09-26T03:10:23+5:302016-09-26T03:10:23+5:30
सत्तेच्या विरुद्ध नि:शस्त्र क्रांती करणाऱ्या जागतिक स्तराच्या नेत्यांपैकी जयप्रकाश नारायण एक होते.

राजकारण, समाजकारणातील मूल्य शिकविणारा लोकनेता
चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे प्रतिपादन :
जयप्रकाश नारायण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
नागपूर : सत्तेच्या विरुद्ध नि:शस्त्र क्रांती करणाऱ्या जागतिक स्तराच्या नेत्यांपैकी जयप्रकाश नारायण एक होते. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जोपासलेली मूल्ये आणि चारित्र्याच्या भरवशावर सत्तेच्या विरुद्ध लोकचळवळी उभारल्या. त्यांनी या लढ्यांमधून राजकारण आणि समाजकारणातील मूल्ये या देशाला शिकविली आहेत. मात्र दुर्दैवाने आजच्या राजकारण्यांनी ही मूल्ये जोपासली नसल्याची खंत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अमरावती रोड, बोले पेट्रोलपंप जवळील सर्वोदय आश्रमात रविवारी लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. सुरेश पांढरीपांडे, अॅड. आशुतोष धर्माधिकारी, डॉ. नलिनी निसळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्या. धर्माधिकारी यांनी जेपी यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून त्यांच्या कार्याची महती वर्णन केली. तरुणांना भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात जोपासलेली मूल्ये समाजकारणातही पाळली. बिहारमध्ये केलेला लढा असो की आणीबाणीच्या काळात सत्तेविरुद्ध उभा केलेला संघर्ष असो, त्यांच्या स्वच्छ व प्रामाणिक चारित्र्यामुळे लोक आपोआपच त्यांच्या लढ्यात सहभागी झाले. लोकलढा उभारण्याच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांवर त्यांचा प्रभाव होता. मात्र त्यांच्या नम्रतेपुढे हे सर्व फोल होते. सर्वोदय आश्रमातील गांधीजी, विनोबा व जेपी यांचे पुतळे मूल्यांचे संदेश देणारे ठरतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी, एक नेता सरकारविरुद्ध उभा राहतो आणि अख्खा देश त्यांच्या मागे येतो ही जेपींच्या कर्तृत्वाचे मोठेपण सांगण्यासाठी पुरेसे असल्याचे मनोगत व्यक्त केले. जेपींचा राजकीय आणि वैचारिक प्रवास मोठा होता आणि त्यांचे कार्य व्यापक होते. जेपी यांच्यावर महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासह मार्क्सवाद व समाजवादाचाही प्रभाव होता. मात्र जेपी कोणत्याही विचारांच्या चौकटीत अडकले नाही. त्यांनी चौकटीबाहेरचे विचार मांडले. जनता नि:शस्त्र लढा देणाऱ्या नेतृत्वाच्या बरोबरीने उभी राहते. गांधीजीनंतर जेपींनी अनेक नि:शस्त्र लढे यशस्वी केले. कामगारांनंतर शेतकऱ्यांचा लढा उभा होईल. मात्र हा भांडवलदाराविरुद्ध नाही तर ग्रामीण लोक शहरांविरुद्ध घेराव घालतील. तेव्हा शोषितांच्या हातून क्रांती होण्याआधी त्यांचे शोषण थांबविले पाहिजे, असा विचार जेपींनी मांडला होता.
६० व ७० च्या दशकात तरुण जेपींच्या नावाने भारावले होते. सर्व पक्षांच्या नेत्यांवर त्यांचा प्रभाव होता. त्यांनी उभारलेल्या लोकलढ्यातून आणि चारित्र्यातून हा प्रभाव निर्माण केला. मात्र सध्याच्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे कार्य पुसून टाकण्याचे राजकारण केले जात असल्याची खंत द्वादशीवार यांनी व्यक्त केली. दलितांना दडपण्याचे आणि अल्पसंख्यांकांना भीती दाखविण्याचे राजकारण होत आहे. अशावेळी पुतळ्याच्या माध्यमातून का होईना, लोकनायकाच्या क्रांतिकारी स्मृती उभ्या राहणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दमयंती पांढरीपांडे व संचालन डॉ. कल्पना तिवारी यांनी केले. सर्वोदय आश्रमाच्या सचिव विशाखा बागडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्यावेळी हरिभाऊ केदार, हरिभाऊ नाईक, अॅड. राजेंद्र राठी, प्रा. सुरेखा देवधर, ए. आर. पांडे, रवींद्र गुडधे, दीपमाला कुबडे, डॉ. प्रकाश पाटील, बाळविजय, मा.म. गडकरी, डॉ. अनिल वाघ, विलास भोंगाडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)