राजकीय ‘नेता’जी

By Admin | Updated: July 19, 2014 02:28 IST2014-07-19T02:28:56+5:302014-07-19T02:28:56+5:30

विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक

Political leader | राजकीय ‘नेता’जी

राजकीय ‘नेता’जी

एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागायची
नागपूर :
विद्यार्थी जीवनापासून सातत्याने विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या नेताजींचा लोकसंग्रह विलक्षण होता. त्यांच्या एका शब्दावर कार्यकर्त्यांची फळी कामाला लागत होती. त्यामुळे सामाजिक चळवळीत त्यांचे वजन वाढले. स्वाभाविकपणे राजकीय पक्षांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण होतेच. यातूनच नेताजी सीपीआय पक्षात दाखल झाले. जवळपास १५ वर्षे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी आणि दलित चळवळीला पाठबळ दिले. याशिवाय प्रत्येक डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध राहिला. त्यानंतर १९९० साली जनता दलाचे आमदार म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून निवडून आले. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द वादळी राहिली. हा माणूस नेता असला तरी सामान्य माणसाशी कायम जुळून राहिला. त्यामुळेच नेताजींबद्दल आपला माणूस असल्याची भावना लोकांमध्ये सातत्याने राहिली. आमदार असतानाच ते अनुसूचित जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्ष राहिले.
सांस्कृतिक क्षेत्रातील काम
नेताजींना नाट्यविषयक आवड होती. सामाजिक काम उभारताना लोकांना एखादा विषय समजावून सांगण्यासाठी पथनाट्यांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे कला क्षेत्राशी ते जुळले होते. अनेकांनी त्यांना नाटक लिहिण्याची विनंती केली होती पण ते या प्रकाराकडे वळले नाहीत. त्यांनी विपुल लेखन केले आहे.
विविध विषयावरचे त्यांचे वृतपत्रीय लेखन गाजले. हे लेखन पुस्तकरूपाने यावे, म्हणून अनेकांनी त्यांना गळ घातली पण नेताजी सातत्याने सामाजिक चळवळीतच गुंतून राहिले. त्यामुळे त्यांचे पुस्तक आले नाही. नागपुरात नुकतेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरिय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. हे संमेलन आयोजित करण्यात नेताजी राजगडकर यांचा पुढाकार सर्वविदित आहे. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर आकाशवाणीतही त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. या दरम्यान विविध वृत्तपत्रात सामाजिक प्रबोधन करणारे त्यांचे स्तंभलेखन चांगलेच गाजले. आदिवासी, दलित आणि डाव्या, पुरोगामी चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने अनेक संस्थांचा मार्गदर्शक दीपस्तंभ कोसळला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.