नागपुरात पॉलीश गॅंग सक्रियच, महिलेला घरात शिरून घातला गंडा
By योगेश पांडे | Updated: September 4, 2023 17:39 IST2023-09-04T17:37:13+5:302023-09-04T17:39:20+5:30
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

नागपुरात पॉलीश गॅंग सक्रियच, महिलेला घरात शिरून घातला गंडा
नागपूर : सोन्याचे दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी नागपुरात सक्रियच आहे. या टोळीने एका महिलेच्या घरात शिरून तिला गंडा घातला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रुखसाना बी शेख रफीक (४५, बाबा ताजनगर, खरबी) या रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलीसह घरी होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम तेथे आले व त्यांनी आम्ही सोन्याचे दागिने पॉलीश करून चमकवून देतो असे सांगितले.
रुखसाना यांनी त्यांना ३ ग्रॅम सोन्याचा हार व ५ ग्रॅमचे मंगळसूत्र दिले. आरोपींनी एका स्टीलच्या भांड्यात पाणी घेत त्यात हळद टाकली. त्यानंतर त्यांनी त्यात दागिने टाकल्याची बतावणी केली. काही वेळाने दागिने त्यातून काढा असे सांगून ते निघून गेले. रुखसाना यांनी भांड्यात हात टाकला असता त्यात दागिने नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वाठोडा पोलीस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोनच्या संख्येत फिरते टोळी
संबंधित टोळीतील सदस्य दोनच्या संख्येने फिरतात व ते अगोदर परिसरात फिरून रेकी करतात. ज्या घरी एकटी गृहिणी किंवा वृद्ध दांपत्य, महिला आहेत तेथे हे जातात. अगोदर ते तांब्या किंवा पितळीचे भांडे चमकावून देतात व समोरच्याचा विश्वास संपादन करतात. जर आपले दागिने चमकावून घ्यायचे असतील तर ते अधिकृत सराफा दुकानातून पॉलीश करून घ्यावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात दागिने देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.