रेल्वे स्थानकांत, वाहनतळांवर 'दो बूंद जिंदगी'के! मध्य रेल्वेचा उपक्रम, १६८५ बालक 'लाभार्थी'
By नरेश डोंगरे | Updated: March 4, 2024 21:23 IST2024-03-04T21:22:48+5:302024-03-04T21:23:29+5:30
बसगाड्या, रेल्वे स्थानकांवर देण्यात आले पोलिओचे डोस

रेल्वे स्थानकांत, वाहनतळांवर 'दो बूंद जिंदगी'के! मध्य रेल्वेचा उपक्रम, १६८५ बालक 'लाभार्थी'
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या, स्थानकांमध्ये आई-वडीलांच्या कुशित असलेल्या १६८५ चिमुकल्यांना पोलीओची खुराक पाजण्यात आली. रविवारी ३ मार्चला ठिकठिकाणी पोलीओ लसीकरणाचा हा उपक्रम राबवून मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने राष्ट्रीय कार्यक्रमास हातभार लावला.
भारतातून पोलीओचे समूळ उच्चाटण करण्याच्या हेतूने १९९५ पासून केंद्र सरकारकडून लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशभरात सलग सांघिक प्रयत्न सुरू असल्याने त्याचे चांगले परिणाम समोर आले आहे. यावेळी पोलीओ लसीकरणाचा कार्यक्रम देशभरात ३ मार्चला घेण्यात आला. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेही सहभाग नोंदविला.
विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. मंजुनाथ यांच्या देखरेखित विविध रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकात बालकांना पोलिओचा डोज देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी २० चमू तैनात करण्यात आल्या. या चमूतील आरोग्य सेवकांनी रविवारी सकाळी ते सायंकाळपर्यंत ठिकठिकाणच्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकूण १६८५ बालकांना पोलीओची खुराक पाजली. बालकांच्या आरोग्याच्या हिताचा हा राष्ट्रीय उपक्रम यशस्वी करणाऱ्या रेल्वेतील आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काैतुक केले.