'तक्रार का दिली' म्हणत चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 14:48 IST2021-10-26T12:45:39+5:302021-10-26T14:48:45+5:30
नागपुरात एका दूध विक्रेत्याने तक्रार का दिली म्हणत चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच बेदम मारहाण केली. मात्र, नंदनवन पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती.

'तक्रार का दिली' म्हणत चक्क पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रार का दिली म्हणत एका दूध विक्रेत्याने पोलीस उपनिरीक्षकालाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार नागपुरच्या नंदनवन भागात उघडकीस आला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत या संदर्भात सविस्तर माहिती दिली नव्हती, हे विशेष.
किरकोळ कारणावरून दूध विक्रेता पितापूत्र आणि साथीदाराने वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांना बेदम मारहाण केली. सुनील अंभोरे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून अतुल बोढारे, कमलनाथ पांडे अशी मारहाण करणाऱ्या व्यक्तिंची नावे आहेत.
अंभारे नंदनवनमधील रतननगरात राहतात. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास कमलनाथ पांडे नामक व्यक्तीकडे अतुल बोढारे नामक दुधविक्रेता कारमधून आला. त्याच्या कारमधील डेकचा आवाज जास्त होता. त्यामुळे अंभोरेने त्याला फटकारले. त्यावरून वाद वाढला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. त्याची तक्रार अंभोरने पोलिसांना फोनवरून केली. त्यामुळे अतुल, त्याचे वडील आणि बाजूचे पांडे यांनी अंभोरेंना जोरदार मारहाण केली. यानंतर प्रकरण नंदनवन ठाण्यात पोहचले. दोन्हीकडून दिवसभर आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे कारवाई करावी की सेटलमेंट या विचारात पोलीस अडकले होते. म्हणून की काय उशिरा रात्रीपर्यंत नंदनवन पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती.