पोलिसांच्या हप्त्याची मिळाली डायरी
By Admin | Updated: May 12, 2014 00:57 IST2014-05-12T00:57:37+5:302014-05-12T00:57:37+5:30
चोरीच्या सामानांची कबाड्याला विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घेतलेल्या हप्त्यांची डायरी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांच्या हप्त्याची मिळाली डायरी
कबाड विक्री प्रकरण : चौकशी होणार
नागपूर : चोरीच्या सामानांची कबाड्याला विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घेतलेल्या हप्त्यांची डायरी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांच्या भूमिकेबाबत सीताबर्डीतील सहायक पोलीस आयुक्तांवर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा लाखो रुपयांचा माल वाडीतील कबाडी अख्तर याला विकला होता. झोन एकचे उपायुक्त अभिनाश कुमार यांनी अख्तरच्या दुकानावर धाड टाकून हे प्रकरण उघडकीस आणले होते. १५ लाखांचा माल जप्त करण्यात आला होता. अख्तरच्या तीन साथीदाराला अटक केली होती. अख्तर आणि त्याचा भाऊ तेव्हा पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अभिनाश कुमार यांच्या निर्देशावर वाडी पोलिसांनी अख्तरचे दुकान सील केले होते. लोकमतने सर्वप्रथम हे प्रकरण उघडकीस आणले होते. सूत्रानुसार पोलिसांना अख्तरच्या दुकानातून एक डायरी मिळाली होती. त्या डायरीमध्ये पोलिसांची नावे आणि त्यांना दिलेल्या हप्त्यांची रक्कम लिहिली होती. यात प्रत्येक डीबीला दोन हजार रुपये देण्यात आल्याचा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)