उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ

By Admin | Updated: March 16, 2015 02:29 IST2015-03-16T02:29:32+5:302015-03-16T02:29:32+5:30

पोलीस असल्याची बतावणी करून सांगून शनिवारी सकाळी साडेतीन तासात पाच ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची घटना घडली.

Police racket looted | उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ

उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करून सांगून शनिवारी सकाळी साडेतीन तासात पाच ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची घटना घडली. शहराच्या विविध भागात घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सर्व घटनात अज्ञात आरोपींनी दोन महिलांसह पाच ज्येष्ठ नागरिकांचे १ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले आहेत.
शनिवारी सकाळी ७.१५ वाजता पहिली घटना अंबाझरीच्या शिवाजीनगर गार्डनजवळ घडली. हिल रोड गोकुळपेठ येथील रहिवासी एल. सुब्रमण्यम (७४) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांना गार्डनच्या मागील दारावर दोन बाईकस्वारांनी पोलीस असल्याचे सांगून थांबविले.
आरोपींनी पुढील चौकात दंगा सुरू केला असल्याची माहिती देऊन त्यांच्या जवळील ३२ हजार रुपये किमतीची अंगठी आणि चेन काढून कागदात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी त्यांची नजर चुकवून दागिने घेऊन पसार झाले. दुसरी घटना प्रतापनगरच्या डॉ. देशपांडे हॉस्पिटलसमोर सकाळी ७.५० वाजता घडली. जयताळा रोडवरील रचना अंगन अपार्टमेंट येथील रहिवासी वसंता विनायक लाजूरकर (७५) सकाळी डॉ. किरणकर यांच्या पॅथॉलॉजीकडे पायी जात होते. दरम्यान त्यांना काळ्या रंगाची बाईक क्रमांक एम. एच. ३१, ९०८० वर आलेले दोन युवक भेटले. आरोपींनी आपण पोलीस असल्याचे सांगून समोरील घरात चोरट्यांनी ४ लाखाचे दागिने लुटल्याची माहिती दिली. आरोपींनी त्यांना त्यांची चेन रुमालात ठेवून घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना रुमाल बांधुन देण्याच्या बहाण्याने दागिने घेऊन पळ काढला. तिसरी घटना सकाळी ८.३० वाजता प्रतापनगरच्या पडोळे चौकात घडली. गोपाळनगरचे रहिवासी निमिचंद बिहारीलाल जैन (६१) पायी पडोळे चौक ते गोपालनगरकडे जात होते. दरम्यान आसिफ मोबाईल शॉपीसमोर त्यांना दोन बाईकवर आलेल्या चौघांनी थांबवून आपण पोलीस असून समोरील चौकात अपहरण होण्याची भीती असल्याचे सांगितले. त्यानंतर जैन यांना सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यावर त्यांची नजर चुकवून आरोपींनी ३२ हजाराचे दागिने घेऊन पळ काढला.
चौथी घटना लकडगंजच्या सतनामीनगर परिसरात सकाळी १०.१५ वाजता घडली. कृष्णाबाई टेकचंद पोपळी (८५) मंदिरातून पूजा करून बाहेर निघाल्या. चार युवकांनी त्यांना थांबवून कथित पूजा शर्मा हिचे दागिने लुटल्याची माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर कृष्णाबाईच्या बांगड्या आणि दागिने काढून कागदात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी नजर चुकवून त्यांचे ५० हजाराचे दागिने घेऊन पळ काढला. तर पाचवी घटना धंतोलीच्या इंडियन जिमखान्यासमोर सकाळी १०.४५ वाजताच्या दरम्यान घडली. तकीया धंतोली येथील रहिवासी सुचित्रा वसंत जोशी (६०) पायी नागपूर नागरिक सहकारी बँकेत जात होत्या. राव बंगल्यासमोर तीन आरोपींनी त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून थांबविले. त्यांनी या महिलेस गोष्टीत मग्न करून त्यांचे ३० हजाराचे दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान दागिने लुटल्यानंतर संबंधित नागरिकांनी आपापल्या परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Police racket looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.