नागपुरात दारुड्याने पेटविली पोलीस चौकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:35 IST2019-03-01T22:30:37+5:302019-03-01T22:35:20+5:30
खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.

नागपुरात दारुड्याने पेटविली पोलीस चौकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली.
प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खामल्यातील जुनी वस्तीत पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीला लागूनच शंकर देवरावजी कानतोडे (वय ४०) याचे घर आहे. बुधवारी मध्यरात्री दारूच्या नशेत तर्र असलेला कानतोडे घराकडे परतला आणि त्याने पोलीस चौकीजवळ शेकोटी पेटविली. काही वेळेनंतर तो बाजुलाच झोपून गेला. या पोलीस चौकीची व्यवस्थित देखभाल होत नसल्यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि कचरा जमला होता. त्यामुळे शेकोटीच्या आगीने आधी तो कचरा आणि नंतर पोलीस चौकी जळाली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी आगीचे कारण शोधले. दिवसभराच्या चौकशीत बाजूला राहणारा आरोपी कानतोडे याच्या निष्काळजीपणामुळे ही पोलीस चौकी बेचिराख झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी भादंविचे कलम ४३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्याचे सहकलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी कानतोडेला अटक केली.