Police barred from celebrating Ram Janmabhoomi: BJP alleges | रामजन्मभूमीचा आनंदोत्सव करण्यापासून पोलिसांनी रोखले : भाजपचा आरोप

रामजन्मभूमीचा आनंदोत्सव करण्यापासून पोलिसांनी रोखले : भाजपचा आरोप

ठळक मुद्देआमदारांकडून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी अयोध्येत रामजन्मभूमीत राममंदिराचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे शहरात जागोजागी आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी जाणूनबुजून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा करण्यापासून रोखले, असा आरोप पक्षातर्फे करण्यात आला आहे.
गिट्टीखदानमध्ये पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले. त्याचप्रमाणे हेडगेवार चौकात सजावट करण्यापासून संजय भेंडे यांना थांबविण्यात आले, तर काही खासगी जागांवर होर्डिंग लावण्यापासून पोलिसांनी रोखले. वैष्णोदेवी चौकात पोलीस निरीक्षकांनी येऊन लाऊडस्पीकर बंद केला व रांगोळी काढण्यापासूनदेखील थांबविले. बऱ्याच ठिकाणी तर तोरण लावण्यापासूनदेखील थांबविण्यात आले. अनेक चौकात पोलिसांनी त्रास दिला, असा आरोप करत भाजप आमदारांनी या कारवाईचा निषेध केला. पोलिसांची ही वागणूक हिटलरशाहीच आहे. आम्हाला आनंदोत्सव साजरा करण्याचादेखील अधिकार नाही का, असा प्रश्न शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. यावेळी आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, आ. नागो गाणार आदी उपस्थित होते.

Web Title: Police barred from celebrating Ram Janmabhoomi: BJP alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.