शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत

By योगेश पांडे | Updated: April 13, 2025 20:59 IST2025-04-13T20:59:06+5:302025-04-13T20:59:06+5:30

५८० शिक्षकांची बोगस दस्तावेजांच्या आधारे ‘शालार्थ’मध्ये नोंद

Police arrest three more accused in connection with embezzlement of lakhs of rupees by creating school IDs for the post of principal | शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत

शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत

नागपूर : शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नसताना बनावट कागदपत्राच्या आधारे पराग पुडके याची मुख्याध्यापकपदाची शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यात शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन निलेश शंकरराव मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर (५३) व शिक्षण उपसंचालक कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीक सूरज पुंजाराम नाईक (४०) यांना अटक केली आहे. उपसंचालक उल्हास नरड यांना या प्रकरणात तीनही आरोपींनी मदत केल्याची बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली.

आतापर्यंत पाच आरोपी अटकेत

या प्रकरणातील एकूण अटकेतील आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. पराग पुडकेला शिक्षकपदाचा अनुभव नसताना आणि कुठेही शिक्षक म्हणून काम केलेले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले. यात शासनाचा पगार घेऊन पुडके फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे मुन्ना वाघमारे यांनी याप्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड, भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी, अधीक्षक, वेतन निश्चिती अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन पुडकेच्या शिक्षक व मुख्याध्यापक पदास मान्यता देऊन शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी सदर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करीत पुडके आणि नरड यांना बेड्या ठोकल्या होत्या.

२०१९ सालापासून तयार होता प्रकार

या घोटाळ्यात तत्कालिन शिक्षणाधिकारी, अधीक्षक तसेच १२ शिक्षणसंस्थांचे कर्मचारी यांच्याकडे संशयाची सुई आहे. त्यांनी संगनमत करून ५८० अपात्र शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीत टाकली होती. २०१९ सालापासून या शिक्षकांनी ४० हजार ते ४८ हजार वेतन उचलत शासनाची फसवणूक केली. शालार्थमध्ये त्यांची नावे टाकण्याचा प्रस्ताव बोगस दस्तावेज बनवून तयार झाला होता. कागदपत्रे बोगस असल्याचा स्क्रुटिनी कमिटीने अभिप्राय दिला होता. मात्र उपसंचालकांनी शालार्थ आयडी जारी केले होते. या घोटाळ्यात ज्यांनी बोगस दस्तावेज बनविले त्यांचादेखील शोध सुरू आहे.

Web Title: Police arrest three more accused in connection with embezzlement of lakhs of rupees by creating school IDs for the post of principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.