पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे

By योगेश पांडे | Updated: August 4, 2025 12:45 IST2025-08-04T12:43:50+5:302025-08-04T12:45:07+5:30

वर्दीमध्ये बंदिस्त भावना : 'सिस्टम'च्या अडथळ्यांत मन हरवतंय

Police are also human, 'emotional welding' of the mind inside the uniform is necessary | पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे

Police are also human, 'emotional welding' of the mind inside the uniform is necessary

योगेश पांडे
नागपूर :
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अन आयुष्याचे हेच ब्रीदवाक्य, यत्र तत्र सर्वत्र त्यांच्या कर्माचे अन् त्याच्याच पूर्ततेचा ध्यास... मग ऊन असो, पाऊस असो किंवा अगदी वादळदेखील. घरात मुलांचा वाढदिवस असो किंवा पत्नीची प्रकृती खालावलेली असो. अगदी जिवलग सवंगड्याकडून आलेली मदतीची आर्त हाक असो किंवा पालकांच्या उपचाराची गरज असो. बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांकडून खासगी आयुष्यापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले जाते. मात्र, असे करत असताना नकळतपणे आप्तांचा होत असलेला अपेक्षाभंग मनाला पोखरत जातो. त्यातूनच मग 'डिप्रेशन'सारख्या नकळत येणाऱ्या समस्येने ते कधी ग्रासले जातात, याची त्यांनादेखील कल्पना राहत नाही. वर्दीला फक्त कर्तव्य माहीत असले, तरी त्याच्या आत मात्र हाडामांसाचा माणूस असतो. माणूस म्हटले, म्हणजे मन, भावना आल्याच. मात्र, वर्दीच्या आतील मनाच्या घालमेलीकडे 'सिस्टम'कडूनच दुर्लक्ष होते. मग त्या मनाची  व्यथा जाणून तरी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होतो. 


नागपूरपोलिसांच्या परिमंडळ चारअंतर्गत याच आठवड्यात एक अनोखा पुढाकार घेण्यात आला. पोलिसांच्या 'मेंटल हेल्थ'वर आधारित सत्रात त्यांचे 'इमोशनल वेल्डिंग' करण्यात आले. तसे पाहिले, तर अनेक अधिकाऱ्यांच्या लेखी हा केवळ एक उपक्रम होता. मात्र, यात सहभागी झालेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि त्यानंतर शरीराच्या कणाकणांत संचारलेले चैतन्य या 'वेल्डिंग'ची पोलिस यंत्रणेला खरोखरच किती आवश्यकता आहे, याची साक्ष देत होते.


कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून समाजाला अनेक अपेक्षा असतात. मात्र, समाज, वरिष्ठ अन् कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करता करता अनेक पोलिस कर्मचारी कधी 'डिप्रेशन'मध्ये अडकतात याची त्यांनादेखील कल्पना येत नाही. कर्तव्यावर असताना त्यांच्यावर सातत्याने दवाव असतो. पोलिस कर्मचारी म्हटला की, तो 'चिरीमिरी 'वालाच आहे किंवा नियम तोडला तरी चिंता नक्को. पाचसौ की नोट मामू को थमा देंगे... असाच अनेक जण विचार करतात. यंत्रणेत काही नासकी फळं असली, तरी त्यावरून सर्वांनाच तसे समजणे चुकीचेच आहे.


कुठल्याही 'अर्थपूर्ण' व्यवहारात किंवा देण्याघेण्यात न अडकणाऱ्या पोलिसांना 'खाबुगिरी' करणाऱ्यांच्या पंक्तीत बसविले जाते अन् त्यातूनदेखील अनेक जण तणावात येतात. नियमानुसार कारवाई करत असले, तरी मग तथाकथित 'इन्फ्लुएन्सर्स' किंवा 'सिटीझन जर्नलिस्ट' व्हिडीओ काढून तुझी नोकरीच घेतो, असे म्हणत कायद्याचे 'ज्ञान' शिकवू लागतात, तेव्हा हा तणाव शिगेला पोहोचतो. त्यातूनच मग वर्दीच्या आतील माणूस खचत जातो अन् वेळेत मदतीचा हात मिळाला नाही, तर अघटित घडण्याचा धोका असतो. त्यामुळेच पोलिसांचे नियमितपणे 'इमोशनल वेल्डिंग' आवश्यक झाले असून, 'एसी'मध्ये बसून निर्णय घेणारी यंत्रणेने आता तरी संवेदनशीलपणाने याचा विचार करावा, असा पोलिसदादांचाच सूर आहे.


वर्दीतील 'डिप्रेशन' ठरू शकते घातक
नागपुरातील खाकी वर्दीतील 'डिप्रेशन'ची काही उदाहरणे समोर आली आहेत. एक पोलिस निरीक्षक शासकीय वाहनाने जात असताना, चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मध्ये टाकली व वेगाने चालवायला लागला. त्याला आवाज देऊन देखील जणू त्याच्या कानापर्यंत काही पोहोचतच नव्हते. अखेर संबंधित निरीक्षकाने समयसूचकता दाखवत गाडी थांबविली. चालक त्यानंतर भानावर आला व जोरजोरात ओरडत डिप्रेशन मध्ये गेल्याचे सांगितले. काही महिला कर्मचाऱ्यांच्या घरी प्रकृतीची समस्या असताना वरिष्ठांनी त्यांची विनंती नाकारून ड्युटी लावली. त्यातून तणावात आलेल्या एका कर्मचाऱ्याने जिवाचेच बरेवाईट करण्याची इच्छा होत असल्याचे बोलून दाखविले. तर जवळच्या नातेवाइकाच्या तेरावीसाठीदेखील वेळ मिळू शकत नसल्याने एक कर्मचारी तणावात गेला होता. समाजाला दुष्ट प्रवृत्तींपासून वाचविण्याचे काम पोलिस करत असतात. कितीही टीका होत असली, तरी त्यांचे हात व मन मजबूत ठेवणे आवश्यक असते. त्यांना आलेले 'डिप्रेशन' हे समाजाला परवडणारे नाही, हे यंत्रणेने समजून घेण्याची गरज आहे.

Web Title: Police are also human, 'emotional welding' of the mind inside the uniform is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.