शेततलावातील मासोळ्यांवर विषप्रयोग: लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 20:33 IST2022-06-29T20:33:17+5:302022-06-29T20:33:44+5:30
Nagpur News शेततलावात राखण्यात आलेल्या मासोळ्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार केल्याचा प्रकार उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी येथे झाला आहे.

शेततलावातील मासोळ्यांवर विषप्रयोग: लाखो रुपयांचे नुकसान
नागपूर: उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथील एका शेततलावात मासोळ्यांवर विषप्रयोग केल्याबाबतची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
पाचगाव येथील रत्नाकर नागपुरे यांची बाह्मणी येथे शेती आहे. या ठिकाणी असलेल्या शेततलावाचे कंत्राट मौजा बाह्मणी येथील श्रीपद भगवान नागपुरे यांनी घेतले आहे. दर तीन वर्षात एक लाख पन्नास हजार रुपये असे कंत्राटाचे स्वरूप होते. या तलावात विविध प्रकारचे मासे सोडण्यात आले होते. या शेतामधील तलावात काही महिन्यातच या मासोळ्यांची विक्री करण्याचे नियोजनसुद्धा होते. यातून साधारणत: १५ लाख रुपयांचे उत्पन्न श्रीपद नागपुरे यांना होण्याची शक्यता होती. अशातच समाजकंटकांनी शेततलावात विषारी औषध टाकून मासोळ्या मारून टाकल्या, असा आरोप श्रीपद नागपुरे यांचा आहे.
अर्जदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून या उद्योगावरच कुटुंबाचे उदरनिर्वाह चालत असते. अन्य कोणतेही साधन नसल्याने याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी. मुख्यमंत्री विशेष निधीतून आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी आदिवासी फासे पारधी संघटनेचे गणेश पवार यांनी केली आहे.