प्लंबरला आता 'वॉटर इंजिनियर' म्हणायचं ! रोजगार मंत्रालयाचा विचार

By आनंद डेकाटे | Updated: June 5, 2025 16:41 IST2025-06-05T16:39:58+5:302025-06-05T16:41:05+5:30

Nagpur : श्रमाचा सन्मान होण्याची गरज

Plumbers should now be called 'water engineers'! Employment Ministry's idea | प्लंबरला आता 'वॉटर इंजिनियर' म्हणायचं ! रोजगार मंत्रालयाचा विचार

Plumbers should now be called 'water engineers'! Employment Ministry's idea

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महाराष्ट्र तसेच देशात रोजगाराची कमी नाही. मात्र, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पसंतीचा रोजगार मिळत नाही. कौशल्य अभाव असल्याने पीछेहाट होते. श्रमाचा सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळेच नळ कारागिराला (प्लंबर) 'वॉटर इंजिनियर'चे नाव देण्याचा शासनाचा विचार असल्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे सांगितले.


विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. रोजगार मेळाव्याला प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, डॉ. समय बनसोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहआयुक्त सुनंदा बजाज, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. कोणतेही काम छोटे अथवा मोठे असत नाही. प्रत्येक कामाला, कष्टाला सारखेच मूल्य असते. आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त केले तर यांच्यामधून मोठे उद्योजक तयार होतील आणि भारत विकसित होईल असे लोढा म्हणाले.


१९ कंपन्या तसेच ३२३ उमेदवार
रोजगार मेळाव्याकरिता १९ कंपन्या तसेच ३२३ उमेदवार उपस्थित होते. यात ॲक्सिस बँक, इंडोरामा, टाटा तनिष्क, लाईट हाऊस सिस्टीम, निको अलाॅय, करण कोठारी ज्वेलर्स, स्मार्ट हायजीया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट नागपूर, मंशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, टाटा स्ट्राईव्ह एक्सटेन्शन सेंटर वाडी नागपूर, ईराॅस मेटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, महाचाय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, एलआयसी ऑफ इंडिया, टाइम प्रो इव्हेंट अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध कंपन्या या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
 

Web Title: Plumbers should now be called 'water engineers'! Employment Ministry's idea