लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच्या संघर्षात हा आधार वाहणारे जीवाभावाचे बैल विकण्याची पाळी त्यांच्यावर आली.
लोखंडी साहित्य बनविणाऱ्यांची दैना : जगण्याच्या संघर्षात बैल विकण्याची पाळी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच्या संघर्षात हा आधार वाहणारे जीवाभावाचे बैल विकण्याची पाळी त्यांच्यावर आली.कधी काळी राजेरजवाडे यांच्या काळात शस्त्र बनविणारे हात, महाराणा प्रताप यांचे वंशज म्हणून अभिमान बाळगणारी माणसे. परंतु काळ बदलला आणि गौरवाच्या गाथा मागे पडल्या. सुरू झाला तो जगण्याचा संघर्ष. या संघर्षात शस्त्र बनविणारी कला शेती आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची अवजारे बनविण्यात लागली. मग या गावातून त्या गावी, या राज्यातून त्या राज्यात पायपीट चालली. यात आधार मिळाला तो बैलगाडीचा. ही बैलगाडी त्यांच्या जगण्याचा आधार झाली. संपूर्ण संसार या बैलगाडीत सामावलेला. एवढी की अनेक महिलांच्या प्रसुती अशा बैलगाडीत झाल्या. ही अवजारे विकण्यासाठी एखाद्या गावात, शहरात अनेक दिवसांचा मुक्काम. गाडीलोहार, गडूलिया लोहार, चित्तोडिया लोहार, पांचाळ लोहार, खाती, खतवाडी आदी भटक्या जमातीचे हे जगणे.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या जमातीवरही मोठे संकट कोसळले आहे. शहरात रस्त्यावर अवजारे विकणारे हे लोक आपल्या गावाकडे परतले आहेत आणि काही परतण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांतही अनेकांना अत्यंत कठीण संकटाला सामोरे जावे लागत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातील विविध गावात त्यांचा अधिवास. पण अवजार विक्रीसाठी सर्वत्र भटकंती. मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या बारभाटी गावात मुक्काम ठोकून सरदार चव्हाण, कल्लूभाई चव्हाण, लल्लूभाई राठोड यांनी नागपूरच्या आसपास अवजार विक्रीचे काम चालविले होते. अशा ६ कुटुंबाच्या जवळपास ६० व्यक्ती २३ बैलगाड्यातून भटकंती करीत होते. लॉकडाऊनच्या दोन महिन्यात कसाबसा संसार सांभाळत त्यांनी दिवस काढले. माल विक्री नाही आणि घरातून बाहेर पडण्यासही मनाई, त्यामुळे खिशात पैसाही राहिला नाही. दान मिळालेल्या अन्नातून उपासमार थांबली पण बैलांचे काय, हा प्रश्न कायम. बैलांना चाऱ्याविना तडफडत मरताना बघणे ही असह्य करणारी गोष्ट. त्यामुळे त्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एरवी ४०-५० हजारात विकली असती अशी बैलजोडी त्यांना ५-७ हजाराला विकावी लागली. काळजावर दगड ठेवून त्यांना हा सौदा करावा लागला. हे सहाही कुटुंब आता मध्य प्रदेशातील गावाकडे निघाले. पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर अश्रू डोळ्यात घेऊन आणि बैलगाड्यांचे सांगाडे ट्रकमध्ये घालून हे सर्व कुटुंब त्यांच्या गावाकडे रवाना झाले. संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादातून त्यांची ही व्यथा समोर आली.